बारामती (प्रतिनिधी)- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती शहरात बांधलेल्या शासकीय इमारती आणि निवडून आणलेल्या ग्रामपंचायत सदस्यांचा कारभार पाहायला एकदा बारामतीला या. कोणत्याही अर्धवट ज्ञानाच्या आधारे बरळत जाऊ नका, अशी टीका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर मासाळ यांनी पत्राद्वारे डॉ. निलेश राणे यांच्यावर केली.
मासाळ म्हणाले की, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे डॉ. निलेश राणे हे चिरंजीव आहेत. राणे यांना महाराष्ट्रात मानणारा एक वर्ग आहे. परंतु कोणत्याही अर्धवट ज्ञानाच्या आधारे आपण जे नेहमीच बरळत असता. त्यामुळे निश्चित राणे यांना देखील आपल्या राजकीय अज्ञानामुळे वाईट वाटत आहे. आपण कधीही घराचे दार उघडून बाहेर पडत नसाल. त्यामुळे अजित पवार यांनी महाराष्ट्रभर केलेले सामाजिक काम आपल्या निदर्शनास आले नसेल. तरीही सततच्या पराभवाने आपण वैफल्यग्रस्त झाला असल्याने कोणत्या झिंगेत आपण वक्तव्य करता, हे समजत नाही तरी आपण थोडीशी झिंग बाजूला ठेवून वेळात वेळ काढून बारामती पाहण्यासाठी आलात तर बरे होईल.
आपल्या डॉक्टर डिग्रीच्या ज्ञानात निश्चित भर पडेल. आपण बारामतीमध्ये आल्यानंतर कधी न पाहिलेल्या शासकीय इमारती आणि शहर आणि तालुक्यातील नागरिकांना दिलेल्या सुविधा पाहून जी झिंग आपल्याला येईल. ती खरोखरच पाहण्यायोग्य असेल. आपल्या वाचनात किंवा ऐकण्यात पण न आलेली बारामती स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी व आपले लहान बंधू आमदार नितेश राणे यांनी तोंडभरून कौतूक केले आहे, त्यांच्याकडून जरी माहिती घेतली असती तरी आपण बालीशपणाचे वक्तव्य केले नसते.
आपण बारामतीमध्ये आल्यानंतर आपल्याला बारामती फिरवून दाखविण्यासाठी अजित पवार यांनी निवडून आणलेले ग्रामपंचायत सदस्य हजर असतील. आपली एक जंगी सभाच होऊन जाईल. अशा आशयाचे पत्र प्रदेश उपाध्यक्ष किशोर मासाळ यांनी डॉक्टर निलेश राणे यांना पाठवले आहे.