नातेवाइकांनी नाकारल्यामुळे वर्षभरापासून ‘फौलदार’ वायसीएम रुग्णालयातच
– संदीप घिसे
पिंपरी – स्मशानभूमीत मरणासन्न अवस्थेत असलेल्या एका रुग्णास दिवंगत नगरसेवक दत्ता साने यांनी वर्षभरापूर्वी वायसीएम रुग्णालयात दाखल केले. काही दिवसांनी तो बराही झाला. मात्र चालता येत नसल्याने त्याच्या नातेवाईकांनी त्यास नाकारले. रिअल लाइफ रिअल पीपलच्या मदतीने हा रुग्ण गेले वर्षभर वायसीएम रुग्णालयात उपचार घेत आहे. वायसीएम रुग्णालय कोविडचे रुग्णालय केल्यानंतरही तो रुग्ण तिथेच होता. शेकडो करोनाबाधितांच्या संपर्कात येऊनही त्यास करोनाची बाधा झाली नाही हे विशेष.
फौलदार चौधरी (वय 45, मुळगाव बिहार) असे या रुग्णाचे नाव आहे. चिखली येथील स्मशानभूमीत मरणासन्न अवस्थेत हा रुग्ण पडून होता. 18 डिसेंबर 2019 रोजी दिवंगत नगरसेवक दत्ता साने यांनी त्यास उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात दाखल केले. महिनाभराच्या उपचारानंतर तो बरा झाला.
वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे आणि डॉ. अनिकेत लाठी यांनी माणुसकीच्या दृष्टीकोनातून त्याचे बिलही माफ केले. येथील समाजसेवक महादेव बोत्रे, कुंडलिक आमले, रवि ढवळे आणि रिअल लाइफ रिअल पीपलचे संस्थापक अध्यक्ष एम. ए. हुसेन यांनी त्याच्या नातेवाइकाचा पोलिसांच्या मदतीने बिहारमध्ये शोध घेतला. मात्र बिहारचे पोलीस घरापर्यंत पोचताच नातेवाईक गावातील घरच सोडून पळून गेले. मग पोलिसांनी पिंपरी चिंचवड शहरात राहणारा फौलदार याच्या पुतण्याला संपर्क करून त्यास घरी घेऊन जाण्यास सांगितले. पोलिसांच्या धाकाने तो घरी घेऊन गेलाही. मात्र काही दिवसांतच त्यास पुन्हा चिखली स्मशानभूमीत आणून सोडले. यामुळे दत्ता साने यांनी त्यास पुन्हा वायसीएम रुग्णालयात दाखल केले.
करोनाचे रुग्ण वाढल्यानंतर संपूर्ण वायसीएम रुग्णालय कोविड रुग्णालय म्हणून कार्यान्वित केले. मात्र फौलदार यांना चालता येत नसल्याने ते वॉर्डातच राहिले. त्या वॉर्डात शेकडो करोनाबाधित उपचार घेऊन घरी गेले. शेकडो जणांच्या संपर्कात येऊनही फौलदार यांना बाधा झाली नाही. या वॉर्डातील रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर आणि कर्मचारी पीपी कीट घालून काम करतात. मात्र फौलदार यांना अशी कोणतीच साधने उपलब्ध नाहीत. आत्तापर्यंत त्यांची चारवेळा करोनाची टेस्ट केली. मात्र प्रत्येकवेळी ती टेस्ट निगेटिव्ह आली. यामुळे डॉक्टर आणि कर्मचारीही अचंबित झाले आहेत.
फौलदार यांना चालता येत नसले तरी आता ते ठणठणीत झाले आहेत. त्यामुळे लवकरच त्यांना पिंपरीतील बेघरांसाठी असलेल्या महापालिकेच्या कक्षात स्थलांतरीत केले जाणार असल्याची माहिती रिअल लाइफ रिअल पीपलचे अध्यक्ष एम. ए. हुसेन यांनी “प्रभात’शी बोलताना दिली.