नगर (प्रतिनिधी) – अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी अफसर लतीफ सय्यद (वय 26, रा. भराडगल्ली, नगर) याला जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एल. आणेकर यांनी दोषीधरून 20 वर्षे सक्तमजुरी व 50 हजार रुपये दंड, अशी शिक्षा ठोठावली आहे.
दंडाची रक्कम पीडित मुलीला नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या गुन्ह्यातील दुसरी महिला आरोपी मुन्नी ऊर्फ शमिना लतीफ सय्यद हिला एक महिना साधी कैद, अशी शिक्षा ठोठावली आहे.
शहरातील अल्पवयीन मुलगी सप्टेंबर 2018 मध्ये सायकल खेळत असताना अफसर सय्यद याने तिला उचलून घराच्या छतावर घेवून गेला होता. पीडित मुलीसोबत सय्यद याने गैरवर्तन करीत तिचा विनयभंग केला. यावेळी पीडित मुलीने केलेला आरडाओरडा ऐकूण मुन्नी ऊर्फ शमिना सय्यद त्याठिकाणी आली. झालेल्या प्रकाराबाबत कोणाला काही सांगू नको, नाही तर मीच तुझ्या घरी येवून तुझ्या आईला तुझे नाव सांगेल, अशी धमकी पीडित मुलीला दिली होती.
दुसऱ्या दिवशी पीडित मुलगी सायकल खेळत असताना अफसर याने पुन्हा तिला उचलून घराच्या छतावर नेले. पीडित मुलीला जीवे मारण्याची धमकी देत त्याने तिच्यावर अत्याचार केला. या घटनेनंतर तोफखाना पोलीस ठाण्यात पोक्सो आदी कलमान्वये आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा तपास तत्कालीन शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस उपनिरीक्षक व्ही. एल. सणस यांनी करून आरोपीविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षाच्यावतीने सहा साक्षीदार तपासले गेले. सरकारी पक्षाच्यावतीने जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील यांनी काम पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी म्हणून सहायक फौजदार लक्ष्मण काशीद व बी. बी. बांदल यांनी सहकार्य केले.