करोना संक्रमणाचा धोका : दररोज सरासरी दीड हजार जण येतात पुण्यात
पुणे – राज्यात विमानाने दाखल होणाऱ्या प्रवाशांमुळे करोना संक्रमणाबाबत चिंता व्यक्त केली जात असतानाच, सद्यस्थितीत सर्वाधिक प्रभावित असलेल्या दिल्लीतून येणारे प्रवासी अधिक असल्याचे दिसून आले आहे. विमानतळ प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार, शहरात येणाऱ्या प्रवाशांमध्ये दिल्लीतील प्रवासी अधिक असल्याची नोंद घेण्यात आली आहे.
मागील काही दिवसांपासून दिल्लीमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात करोनाचा प्रसार वाढू नये, यासाठी दिल्लीसह गुजरात, राजस्थान, गोवा या 3 राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमानप्रवाशांना करोनाच्या “आरटी-पीसीआर’ चाचणीचा अहवाल निगेटिव्ह येणे बंधनकारक आहे. त्याचा अहवाल निगेटिव्ह असल्यासच बोर्डिंग पास देण्यात येत आहे.
तर पुणे विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांची महापालिकेकडून चाचणी करण्यात येत आहे. मात्र, निर्बंध असणाऱ्या चारही राज्यांतून येणारे प्रवासी पॉझिटिव्ह येत असल्याचे चित्र आहे. करोना चाचणीच्या प्रक्रियेतून सुटण्यासाठी अनेक जण कनेक्टिंग फ्लाइट्सचा फंडा वापरत असल्याचे देखील चित्र आहे. यामुळे करोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पुणे विमानतळावर दिल्लीहून ये-जा करणाऱ्या विमानांची संख्या अधिक असून, मागील आठवडाभर पुण्यात सर्वाधिक विमान प्रवासी दिल्लीहून दाखल झाल्याचे चित्र आहे. दररोज साधारण दीड हजारांहून अधिक प्रवासी शहरात दाखल होत आहेत. तर गोव्याहून मागील आठवडाभरात एकही प्रवासी विमानाने दाखल झाला नाही. तर 4 राज्यांतून आलेल्या प्रवाशांपैकी 500 हून अधिक जणांची चाचणी केली आहे.