नवी दिल्ली – करोनावरील लस आता लवकरच उपलब्ध होणार असून तिचे वाटप कसे करायच याचे सूत्र आता तयार केले जात आहे. त्यानुसार देशाच्या विविध भागातील आरोग्य कर्मचाऱ्यांना या लसीचा पहिला लाभ दिला जाणार आहे असे सांगण्यात येत आहे.
ही यादी जवळपास एक कोटी लोकांची आहे. देशातल्या 92 टक्के सरकारी रूग्णालयातील कर्मचाऱ्यांना आणि 55 टक्के खासगी रूग्णालयांतील कर्मचाऱ्यांना या लसीचे डोस उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
करोनावर एकूण पाच नवीन लसी तयार केल्या जात आहेत. त्यातील चार लसींच्या संशोधनांचे काम दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात आले आहे.
या लसी पुरवण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांची यादी तयार करून पाठवण्याची सुचना सर्व राज्य सरकारांना आणि केंद्रशासित प्रदेशांना करण्यात आली आहे. एमबीबीएसचे विद्यार्थी व आशा वर्कर्सही करोनाविरूद्धच्या लढाईत योगदान देत असतात त्यामुळे त्यांनाहीं या योजनेत सहभागी करून घेण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात केवळ आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचाच समावेश केला जाणार असल्याने त्याची योजना आणि यादी तयार करण्यासही सर्व राज्यांतील सरकारांना सांगण्यात आले आहे.
सन 2021 च्या पहिल्या तिमाहीत ही लस उपलब्ध होईल अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी नुकतीच दिली आहे.