…म्हणून भारताला परवडणार नाही मॉडर्ना आणि फायझरची लस

जानेवारी आणि फेब्रुवारित होणार उपलब्ध

नवी दिल्ली – करोनाला वर्ष झाले आहे. या काळात जगभरात 250 लशींवर काम सुरू असल्याची माहिती खुद्द आरोग्यमंत्र्यांनीच दिली आहे. 2021 वर्षाच्या पहिल्या तिमाहीत लस मिळणारच असा दावा खात्रीशीरपणे केला जातो आहे. मात्र नक्की कोणती लस भारताला उपयुक्त ठरणार याचा विचारही करावा लागणार आहे.

फायझरची लस: 

सध्या पाच लसी अंतिम टप्प्यात आल्या आहेत. किंबहुना त्यांनी त्यांचे अंतरिम निष्कर्षही जारी केले आहेत. त्यानुसार अमेरिकेच्या फायझर बायोएन्टेकची लस 95 टक्के उपयुक्त ठरली असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या लसीची किंमत साधारणत: 19.50 डॉलर असणार आहे. अर्थात एवढ्या किमतीत त्यांनी अमेरिकी सरकारसोबत डील केले आहे.

उपयुक्तततेच्या बाबतीत हीच लस सगळ्यांत सुरक्षित आणि गुणकारी ठरणार असे मानले जात आहे. मात्र तिचे उत्पादन आणि साठवणूक व वाहतूक हा अत्यंत कळीचा मुद्दा ठरणार आहे.

मॉडर्नाचीही आघाडी 

या लसीला उणे 70 अंश सेल्सियसच्या आसपासच्या तापमानात ठेवावे लागणार आहे. त्यामुळे तेवढ्या शीतगृहांची आवश्‍यकता भासणार आहे. तसे केले नाही तर लस बाद होण्याची शक्‍यता आहे. लसीची वाहतूक हाही मोठा विषय आहे. तेवढी यंत्रणा सध्या तरी भारताकडे नाही.
अमेरिकेच्याच मॉडर्नाने लस तयार केली आहे.

त्यांच्या अंतरिम अहवालानुसार त्यांची लसही 94.5 टक्‍के उपयुक्त ठरली आहे. याची किमंत साधारणत: 32 ते 37 डॉलर असणार आहे. मोठी ऑर्डर असेल तर ती थोडी कमी होईल. मात्र फायझरच्या लसीप्रमाणे साठवणूक आणि वाहतूक या दोन बाबी या लसीच्या संदर्भातही अडचणीच्या ठरणार आहेत.

भारतासाठी व्यवहार्य काय? 

या शिवाय भारत सगळ्यांत अपेक्षा लावून बसला आहे ती म्हणजे ऑक्‍स्फर्डची कोव्हिशिल्ड ही लस. भारतात सीरम इन्स्टिट्यूटकडून त्याच्या चाचण्यात घेतल्या असून ही कोव्हिशिल्ड लस तिसऱ्या टप्प्याच्या चाचणीत 90 टक्के परिणामकारत ठरल्याचे सांगण्यात आले आहे.

अर्थात अंतरिम निष्कर्ष जाहीर झालेल्या या तीन लशींमध्ये कोव्हिशिल्डचा समावेश आहे. ऑक्‍स्फर्ड ऍस्ट्राझेनेका कडून तयार करण्यात आलेल्या लशीची किंमत तीन ते पाच डॉलर असणार आहे. अर्थात ती भारतीय रूपयांत 250 रूपयांपर्यंत मिळेल. शिवाय या लशीच्या साठवणुकीसाठी उणे 70 अंश सेल्सीयस असे तांत्रिकदृष्ट्या किचकट काम राहणार नसल्याचेही आताच्या टप्प्या सांगण्यात आले आहे.

ही लस फ्रिझ टेम्परेचर अथवा 2 ते 8 अंश सेल्सियस तापमानात स्टोअर केली जाउ शकते असा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे साठवणूक आणि वाहतूक सुविधा आणि दर या दोन्ही बाजूंनी विचार केला तर कोव्हिशिल्डच भारतासाठी सर्वार्थाने उपयुक्त असणार आहे.

शिवाय ही लस जानेवारीपर्यंत उपलब्ध होउ शकते असेही आता जवळपास स्पष्ट झाले आहे.
याशिवाय भारत बायोटेक कोव्हॅक्‍सिन आणि झायडस कॅडीलाची आणखी एक लस या लशींवरही भारताची नजर आहे. यातील कोव्हॅक्‍सिनकडूनही भारताला अपेक्षा आहेत. ही लसही परवडणाऱ्या दरात आणि फेब्रुवारीच्या सुमारास उपलब्ध होण्याचा अंदाज वर्तवला जातो आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.