नवी दिल्ली – भारतीय संघासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका सुरू होण्यापूर्वीच दिलासादायक बातमी मिळाली आहे. त्यांचा नवोदित पण अत्यंत भेदक वेगवान गोलंदाज केन रिचर्डसन दुखापतीमुळे जायबंदी झाला आहे. त्याला यामुळे या मालिकेतून माघार घ्यावी लागली असल्याने भारतीय संघासाठी ही बाब पथ्यावरच पडणार आहे. त्याच्या जागी आता वेगवान गोलंदाज ऍण्ड्रयू टाय याचा संघात समावेश करण्यात आला आहे.
भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेला येत्या 27 नोव्हेंबरपासून पहिल्या एकदिवसीय सामन्याने सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिले दोन एकदिवसीय सामने सिडनीत होणार आहेत. तिसरा एकदिवसीय सामना तसेच पहिला टी-20 सामना कॅनबरा येथे होणार आहे.
उर्वरीत दोन टी-20 सामने सिडनीमध्ये होतील. या मालिकेसाठी संघात निवडल्या गेलेल्या टायने जवळपास दोन वर्षांनी पुनरागमन केले आहे. त्याने 2018 साली भारताविरुद्धचा अखेरचा सामना खेळला होता. त्याने 7 एकदिवसीय सामन्यांत 12 तर, 26 टी-20 लढतीत 40 बळी घेतले आहेत.