पुणे – सुबक रांगोळ्यांनी असलेले प्रवेशद्वार, घरोघरी लागलेले आकाशकंदील, विद्युत रोषणाईचा झगमगाट, फुलांची आरास, लाखो दिव्यांनी लखलखणारे शहर आणि वातावरणातील सकारात्मकता असे वातावरण शहराच्या विविध भागांत पाहायला मिळाले. उत्साही वातावरणात शनिवारी नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन पार पडले.
नरकचतुर्दशीच्या दिवशी अभ्यंगस्नानानंतर देवदर्शन करणे हा अनेक पुणेकरांचा नेम असतो. पुणेकरांनी यंदा यामध्ये बदल केला असून, अभ्यंगस्नानानंतर नागरिकांनी घरी फराळाचा आस्वाद घेतला. तर काहींनी मंदिराबाहेरून देवाचे दर्शन घेतले. दरवर्षी नरकचतुर्दशीला पहाटे फटाक्यांची आतषबाजी पाहायला मिळते. परंतु यंदा करोनामुळे फटाक्यांचे प्रमाण कमी होते. मात्र, सायंकाळी लक्ष्मीपूजनानंतर उशिरापर्यंत फटाक्यांची आतषबाजी पुण्यात सुरू हाेती.
दीपोत्सवातील महत्त्वाचा दिवस असणारे लक्ष्मीपूजन देखील शहरात भक्तीभावाने पार पडले. पारंपरिक वेशभूषेत नागरिकांनी कुटुंबियांसह सायंकाळी घरोघरी, व्यावसायिक ठिकाणी, दुकांनांमध्ये लक्ष्मीपूजन झाले. यावेळी अनेकांनी चोपडीचे पूजन देखील केले. यावेळी घरातील सोन्या-चांदीचे दागिने, लक्ष्मीची मूर्ती, प्रतिमा, नाणी, नोटांसह लक्ष्मीचे प्रतीक असणारी केरसुणी मांडून भक्तीभावाने पूजन करण्यात आले. लाह्या, बत्तासे, गुळ, खोबरे, पेढ्यांसह मिठाईचा नैवेद्य अर्पण केला.
लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त सायंकाळचा असला तरी, व्यापाऱ्यांची मात्र दुपारपासूनच लगबग सुरू होती. कार्यालये आणि दुकाने फुलांसह आकर्षक विद्युत रोषणाईने सजली होती. व्यापारी वर्गात दिवाळीतील धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन आणि पाडवा हे सण महत्त्वाचे असतात. त्यामुळे दुकानांसह व्यापाराच्या ठिकाणी लक्ष्मीपूजन झाले. यावेळी व्यापाऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने चोपडी पूजन केले.