सफाई कामगार महिलांना मिळणार साडेनऊ हजार रुपये बोनस, कोविड भत्ता
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या सोळाशे सफाई कर्मचाऱ्यांना दिवाळी निमित्त 8.33 टक्के बोनस आणि आपत्ती परिस्थितीत सेवा दिल्याबद्दल कोविड काळात नऊ हजार पाचशे रुपये कोविड भत्ता मिळणार आहे. याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या दालनात बैठक घेण्यात आली. या वेळी मुख्य आरोग्य अधिकारी अनिल रॉय, सहायक आरोग्य अधिकारी देशपांडे, बाबा कांबळे व ठेकेदार उपस्थित होते.
कष्टकरी कामगार पंचायत वतीने या सफाई कर्मचाऱ्यांच्या बोनसचा विषय लावून धरला होता. त्याकरिता अनेकदा आंदोलन करण्यात आले होते. तसेच पंचायतीच्या वतीने सतत पाठपुरवठा केला. महिलांची दिवाळी बोनस आणि कोविड काळात दिलेल्या सेवेबाबत विशेष भत्ता मिळणार आहे.
सफाई कामगारांना बोनस कोविड भत्ता मिळावा, यासाठी उपमहापौर केशव घोळवे, पक्षनेते नामदेव ढाके, नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी मध्यस्थी करीत आयुक्तांसोबत बैठक घडवून आणत प्रश्न सोडविण्यासाठी सहकार्य केले.
यावेळी बळीराम काकडे, प्रल्हाद कांबळे, मधुरा डांगे, सविता लोंढे, मंगल तायडे, कांताबाई कांबळे, संगीता जानराव, प्रमिला गजभारे, अरुणा पवार, अनिता सावळे, अजय लोंढे, विठ्ठल गायकवाड आदी उपस्थित होते.