विकासकामांना येताहेत अडथळे
पिंपरी – महापालिकेच्या स्थायी समिती सभांना आयुक्तांसह अधिकारी गैरहजर राहत असल्याने विकासकामांना अडचणी येत आहेत. पुणे पदवीधर आणि शिक्षक विधानपरिषद निवडणुकीसाठी सुरू असलेल्या आचारसंहितेने धोरणात्मक निर्णय घेता येत नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
महापालिकेच्या 28 ऑक्टोबर आणि 4 नोव्हेंबरच्या दोन तहकूब स्थायी समिती सभा आज पुन्हा 18 तारखेपर्यंत तहकूब करण्यात आल्या. सध्या निवडणूक आचारसंहिता सुरू असल्याने अत्यावश्यक कामासाठी सभा बोलावायची असल्यास जिल्हाधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घ्यावी लागेल, असे आदेश आहेत. त्यामुळे बुधवारी होणाऱ्या नियमित सभेची कार्यपत्रिका काढण्यात आली नव्हती.
दरम्यान, सभांना आयुक्त व अधिकारी गैरहजर राहत असल्याने त्याविषयी स्थायी समिती सदस्य अभिषेक बारणे यांनी नाराजी व्यक्त केली.
अनेक प्रश्न प्रलंबित – अभिषेक बारणे
सभा तहकूब करण्यात येत असल्याने विविध समस्यांसंदर्भात चर्चा करता येत नाही. शहरात सुरू असलेल्या विकासकामांची स्थिती काय? ठिकठिकाणी रस्ते खोदून ठेवले आहेत. थेरगावच्या व अन्य भागात दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. “आपलं कुटुंब-आपली जबाबदारी’ या मोहिमेत सर्वेक्षण करणाऱ्या स्वयंसेवकांना मोबदला देण्यात आलेला नाही. अशा विविध प्रश्नांसंदर्भात स्थायी समिती सभेत चर्चा होणे अपेक्षित आहे.
पुणे पदवीधर आणि शिक्षक विधानपरिषद निवडणुकीसाठी सुरू असलेल्या आचारसंहितेने सभा तहकूब होत आहेत. त्यामुळे मी सभांना उपस्थित राहिलेलो नाही. आचारसंहितेने धोरणात्मक निर्णय घेता येत नाहीत. काही विषयांबाबत जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी मागितली आहे. त्यांची परवानगी मिळाल्यास त्या विषयांबाबत निर्णय होऊ शकेल.
– श्रावण हर्डीकर, आयुक्त.