मुंबई – महाराष्ट्रात विविध ठिकाणी घरगुती निवास (होम स्टे) आणि बेड अँड ब्रेकफास्ट (बीअँडबी) पद्धतीने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत (एमटीडीसी) पर्यटन व्यवसायाद्वारे स्थानिकांना रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. याच योजनेअंतर्गत पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी आणि अपरिचित पर्यटनस्थळे प्रकाशात आणण्यासाठी एमटीडीसी एका खासगी कंपनीसमवेत भागिदारी करत आहे. घरगुती निवास आधारित पर्यटनाला चालना देताना या भागिदारीच्या माध्यमातून फारशा परिचित नसलेल्या पर्यटन स्थळांकडे पर्यटकांचा ओघ वळवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, ज्यामुळे राज्यात समुदाय केंद्री समावेशक पर्यटनाचे उद्दिष्ट साध्य होऊन आर्थिक प्रगतीला बळकटी मिळेल.
या भागिदारीची घोषणा करताना महाराष्ट्राचे पर्यटन, पर्यावरण व वातावरण बदल आणि प्रोटोकॉल मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, महाराष्ट्र हे पर्यावरण आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध राज्य असून पर्यटकांना नेहमीच आगळावेगळा अनुभव मिळतो. पर्यटकांना सहज उपलब्ध, किफायतशीर आणि दर्जेदार पर्यटनांचा अनुभव देणाऱ्या शाश्वत अशा समुदायकेंद्री आदरातिथ्य सुविधेच्या बळकटीकरणासाठी सरकार कटिबद्ध आहे. यात सुरक्षिततेचा मुद्दा देखील महत्त्वाचा आहे. एअरबीएनबी कंपनीच्या सहकार्याने राज्यात पुढील काही महिन्यांमध्ये पर्यटनाच्या पुनरुज्जीवनासाठी आम्ही राज्यात घरगुती निवास आणि ब्रेड अँड ब्रेकफास्टच्या विकासासाठी आवश्यक परिसंस्था अधिक बळकट करू.
महाराष्ट्रातील आजवर फारशी परिचित नसलेल्या, पण पर्यटकांना वेगळा अनुभव देणाऱ्या जवळपासच्या पर्यटनस्थळांची प्रसिद्धी करेल. शेतावरील निवासासह पर्यटकांना नेहमीपेक्षा वेगळ्या गोष्टी करण्याची संधी देणाऱ्या एमटीडीसीच्या महाराष्ट्रातील तीन पर्यटनकेंद्रांचा समावेश असेल. शाश्वत पर्यटन परिसंस्थेला पाठबळ देणे आणि राज्यातील अस्तित्वातील व येऊ घातलेल्या पर्यटनस्थळांना प्रकाशझोतात आणणे या दोन्ही पक्षांच्या बांधिलकीला या निर्णयामुळे बळ मिळाले आहे.
ज्ञानाची देवाणघेवाण आणि यजमानांसाठी प्रशिक्षण कार्यशाळांच्या माध्यमातून या योजनेमुळे स्थानिक समुदायांमध्ये रोजगार निर्मिती आणि उपजीविका उपलब्ध करून देण्याची पर्यटन क्षेत्राची क्षमता वाढण्याबरोबरच अधिकाधिक पर्यटक आपल्या शहरांजवळच्या पर्यटनस्थळांच्या शोधात असल्याने आगळ्यावेगळ्या निवासाच्या आगळ्यावेगळ्या सोयी देखील प्रकाशझोतात येतील.