पणत्या खरेदीसाठी कुंभारवाडा ग्राहकांनी फुलला
धिरेंद्र गायकवाड
कात्रज – दिवाळी म्हटलं किरकोळ विक्रेत्यांना चिनी वस्तुंची धास्ती वाटत होती. परंतु, यंदा 90 ते 95 टक्के तकलादू चिनी वस्तू बाजरपेठेतून गायब झाल्या आहेत. यामुळे दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहक कुंभारवाड्याकडे वळू लागले आहेत. यातूनच मातीच्या पणत्या, भारतीय बानावटीच्या सिरॅमिक पणत्यांसह मातीचे आकाशकंदील आणि किल्ल्यांना मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
उपनगर भागातील बाजारपेठांसह कुंभारवाड्यात ग्राहकांची वर्दळ वाढू लागली आहे. चिनी पणत्या बाजारातून गायब झाल्याने ग्राहक पुन्हा मातीच्या पणत्यांची मोठ्या प्रमाणात खरेदीकरीत असल्याचे चित्र आहे. के.के. मार्केट रस्त्यावरील कुंभारवस्तीत पणत्यांची बाजारपेठ फुलली असून 40 प्रकारच्या पणत्या विक्रीस उपलब्ध आहेत.
यंदा मातीच्या पणत्यांमध्ये शेकड्यामागे 20 रुपयांची वाढ झाली आहे. मातीपासून बनवलेल्या पणत्यांना मोठी मागणी असल्याचे विक्रेते सांगतात. सध्या, बाजारपेठत पणत्या व मातीचे आकाशकंदील तसेच सजावटीच्या सहित्यांसह बच्चेकंपनीसाठी तयार किल्ल्यांनाही चांगली मागणी असल्याचे व्रिक्रेत्यांनी सांगितले.