वॉशिंग्टन – अमेरिकेच्या अध्यक्षपदाची चुरसीची लढत ज्यो बायडेन हेच जिंकत असल्याचे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. तरीपण विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मात्र अजून आपला पराभव मान्य करण्यास तयार नाहीत.
उलट त्यांनी आता अधिकच आक्रमक भूमिका घेत, बायडेन यांनी अध्यक्षपदावर चुकीचा दावा सांगू नये असा इशारा त्यांना दिला आहे. आताशी कुठे कायद्याची प्रक्रिया सुरू होत आहे, असा इशाराही त्यांनी बायडेन यांना दिला आहे.
अजून काही प्रांतातील मतमोजणी पूर्ण संपलेली नाही. तथापि, त्यात बायडेन यांच्याच बाजूने कोैल जात असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ट्रम्प यांनी आता जाहीर व्यासपीठावर येणे टाळले आहे. पण टिृटरवरून त्यांच्या प्रतिक्रिया, इशारे सुरूच आहेत.
एका ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की अजून पाच राज्यांतील मतमोजणी पूर्ण व्हायची आहेत. त्या पाचही राज्यांत मी जिंकणार आहे, असे मी 3 नोव्हेंबरच्या रात्रीच सांगितले होते. तेथे मला मोठे मताधिक्क्य मिळेल, असेही मी नमूद केले होते. पण एक दिवसानंतर मात्र माझे हे मताधिक्क्य गायब झाले आहे. पण या संबंधात मी न्यायालयीन लढा देत आहे आणि ही न्यायालयीन लढ्याची प्रक्रिया जशी पुढे जाईल तसे माझे मताधिक्क्य वाढलेले दिसेल, असा दावा त्यांनी ट्विटरवर केला आहे.
शुक्रवारी ज्यो बायडेन मात्र पूर्ण शांत राहिले. त्यांनी कोणतेच विधान केले नाही किंवा सोशल मीडीयावरही त्यांनी कोणती प्रतिक्रिया दिली नाही. काल त्यांच्या उपाध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस याही शांतच राहिल्या होत्या. पण ट्रम्प यांचे इशाऱ्यावर इशारे सुरू आहेत. काल अमेरिकन संसदेच्या सभापती नॅन्सी पेलोसी यांनी बायडेन यांचा उल्लेख निवड झालेले अध्यक्ष असा केला आहे.
त्यामुळे बायडेन यांच्या विजयाची खात्री आता जवळपास सर्वांनाच झाली आहे. मात्र बायडेन यांनी असा कोणताही दावा करण्याचे धाडस दाखवू नये, अशी सूचना ट्रम्प यांनी बायडेन यांना केली आहे.