संगमनेर शहर पोलिसांची धडक कारवाई
संगमनेर : संगमनेर खुर्द परिसरात सुमारे नऊ लाख तीस हजार 910 रुपये किंमतीचा 46 किलो 425 ग्राम गांजा जप्त करण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री 11 : 15 च्या सुमारास संगमनेर शहर पोलिसांनी ही कारवाई केली. घरात विक्रीच्या उद्देशाने हा गांजा साठवून ठेवला होता. याबाबत दोन आरोपींवर गुन्हा दाखल झाला असून दोघेही फरार आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री सव्वा अकरा वाजता संगमनेर खुर्द परिसरात वर्पे वस्तीत सीमा राजू पंचारिया यांच्या घरात तब्बल 9 लाख 30 हजार 910 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला. यामध्ये 46 किलो 425 ग्रॅम वजनाचा काळपट हिरवे रंगाचे पाने, फुले, काड्या, बिया शेंडे असलेले उग्र वासाचा गांजा, 250 रुपये किमतीचा इलेक्ट्रॉनिक वजन काटा आणि 30 प्लास्टिकच्या पिशव्या मिळून आल्या.
याबाबत संगमनेर शहर पोलीस ठाण्यात सीमा राजू पंचारिया (रा कसारा दुमाला, संगमनेर) आणि राजू चव्हाण (रा. संगमनेर, पूर्ण नाव माहीत नाही) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र पोलिसांची चाहूल लागताच दोघेही फरार झाले.
सीमा पंचारिया वर याआधीही गांजा तस्करी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याबाबत पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने आणि पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पंकज शिंदे हे करत आहेत.