पुणे हे साहित्यशोधाचे तीर्थक्षेत्र
पुणे, ता. 1 – पुणे हे मराठी साहित्याचेच नव्हे तर भारतीय साहित्य अध्ययनाचे केंद्र असल्याचा उल्लेख करून धर्मवीर भारती म्हणाले, म्हणूनच साहित्याच्या शोधासाठी पुणे हे तीर्थक्षेत्र आहे. म्हणून मला येथे येण्यास आनंद वाटतो आहे.
सर्व भारतीय भाषांत मराठी वाङ्मय आजतरी सर्वश्रेष्ठ झाले आहे भारतीय भाषातील साहित्य पाहिले असता मराठी साहित्य आज तरी सर्वश्रेष्ठ आहे कारण मराठी साहित्यातून सामाजिक जीवनाचे अचूक विश्लेषण जाणीवपूर्वक केलेले आढळते, असा गौरव धर्मयुगाचे संपादक व श्रेष्ठ हिंदी साहित्यिक धर्मवीर भारती यांनी पुणे येथे जाहीरपणे केला.
यावेळी पु. ल. देशपांडे म्हणाले, मराठी लेखकांनी साहित्यातील नव्या वाटा शोधताना नव्या अनुभूतीचा मागोवा घेतला याचे समाधान वाटते. मराठी वाङ्मयातील सर्व प्रांतात लक्ष वेधणारी लघुकथा हे दालन आहे. कारण तपशिलास महत्त्व नाही. त्यातील अनुभूती केवढी आहे त्यास महत्त्व आहे.
प्राप्तिकर द्यावयाचा तर खूप प्रॅक्टिसला अर्थ काय?
मुंबई – माजी मुख्य न्यायाधीश बॅ. छगला यांनी आपले अल्पचरित्र नुकतेच प्रसिद्ध केले आहे. त्याचे नाव “रोझेज इन डिसेंबर’ असे आहे. त्यात त्यांनी वकिलांच्या प्रॅक्टिससंबंधी असे मत प्रदर्शित केले आहे की, हायकोर्टात खूप प्रॅक्टिस असली म्हणजे सर्व काही मिळाले असे नव्हे.
कारण 100 रु. पैकी 97 रु. कर भरणे असेल तर त्या प्रॅक्टिसला काय अर्थ आहे? आणि मी कर भरणारा आहे. आज कर न भरणे ही फॅशन झाली आहे. बॅ. छगला म्हणतात, मला काम केलेच पाहिजे नाही तर मी नष्ट होईन शारीरिकदृष्ट्या नव्हे तर मानसिकदृष्ट्या!
आता गुजरातलाही टेलीव्हिजन केंद्र हवे!
गांधीनगर – अहमदाबाद येथे दूरचित्रवाणी केंद्र उभारावे, अशी मागणी गुजरात सरकारने केंद्राकडे केली आहे. अशी माहिती मुख्यमंत्री चिमणभाई पटेल यांनी विधानसभेत एका प्रश्नाला लेखी उत्तर देताना दिली.