पुणे –लस देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सिरिंजचा पुरवठा कमी होत असेल तर पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेने सिरिंज विकत घ्यावे, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.
विधानभवन येथे करोना आढावा बैठकीनंतर पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, लस देण्यासाठी सिरींजची कमतरता भासत असल्याने पिंपरी चिंचवड महापालिकेने एक लाख सिरींजची खरेदी केली.
पुणे महापालिकेने देखील अशाचप्रकारे आवश्यकतेनुसार सिरींज खरेदी करून उपलब्ध करून घ्यावे. केंद्र सरकारकडून लसीच्या कोट्यानुसार सिरिंज उपलब्ध करून दिल्या जातात. आता लस उपलब्ध आहेत.
मात्र, त्या प्रमाणात सिरिंज नसल्याचे समोर आले आहे. काही कारणांमुळे सिरिंज तुटवडा असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्या खरेदी कराव्यात. ती जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांनी घ्यावी. ग्रामीण भागात एक रुग्णालय स्वतंत्र कोविड रुग्णालयात, प्राथमिक आरोग्य केंद्रात आवश्यक सुविधा निर्माण करण्यात याव्यात. त्यासाठी आवश्यक असल्यास जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही पवार यांनी सांगितले.
डोस घेतल्यानंतरही काळजी घ्या…
करोना लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर 0.19 टक्के नागरिकांना तर दुसरा डोस घेतल्यानंतर 0.25 टक्के नागरिकांना करोना झाला आहे. करोनाची लस घेतल्यानंतर नागरिक बिनधास्त राहात आहे. मास्कचा वापर न करणे, सामजिक अंतर न पाळणे आदी करोना विषयक नियमांचे पालन त्यांच्याकडून होत नसल्याने लस घेतल्यानंतर त्यांना करोना होत असल्याचे निदर्शनास येत आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.