फलटण – मराठा समाजाला मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रे देण्याच्या अनुषंगाने अभिलेख्यांची तपासणी प्रशासनाकडून करण्यात येत आहेत. आतापर्यंत एक लाख 24 हजार 29 नोंदी तपासण्यात आल्या असून, 888 कुणबी नोंदी आढळल्याची माहिती तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी दिली. मराठा समाजाला मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रे देण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या समितीची व्याप्ती राज्यभरात वाढवण्यात आली आहे. त्यानुसार सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
जिल्हा आणि तालुका स्तरावरील सर्व महसूल कार्यालयांमधील अभिलेखे तपासणीची कार्यवाही सुरू आहे. तहसील कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालय स्तरावर पेरेपत्रके, कुळ नोंदवही, हक्कनोंद पत्रके, कोतवाल बूक नकला, टिपण बूक, योजना बूक तपासणी युद्धपातळीवर करण्यात येत आहे. फलटण तालुक्यातील तहसील कार्यालयात शनिवार (दि. 18) पर्यंत एकूण एक लाख 24 हजार 29 नोंदी तपासण्यात आल्या आहेत. त्यात कुणबी जातीच्या 888 नोंदी आढळल्या आहेत.
दुय्यम निबंधक कार्यालयात 30 हजार 936 नोंदी तपासण्यात आल्या. त्यात एकही कुणबी नोंद आढळलेली नाही. या कामाला गती देण्यासाठी आणि समन्वयासाठी तहसील कार्यालयात विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. महसुली अभिलेख, शिक्षण विभाग, इतर शासकीय विभागांकडील अभिलेख वगळता, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी जातीचे अभिलेखे किंवा पुरावे असलेल्या नागरिकांनी विशेष कक्षात माहिती द्यावी, असे आवाहन डॉ. जाधव यांनी केले आहे.