99 टक्के शक्यता : जागतिक हवामान संघटनेचा अंदाज
पुणे – जागतिक पातळीवर 2023 हे सर्वांत उष्ण वर्ष असण्याची शक्यता 99% पेक्षा जास्त आहे, असे जागतिक हवामान संघटनेने म्हटले आहे. याबाबत संस्थेने नॅशनल ओशनिक अँड ऍटमॉस्फेरिक ऍडमिनिस्ट्रेशनच्या (एनओएए) निष्कर्षांचा हवाला दिला आहे.
दरम्यान, पुढील पाचपैकी कोणतेही एक वर्ष जागतिक पातळीवर सर्वाधिक उष्ण ठरू शकते, असा अंदाज जागतिक हवामान संघटनेने जानेवारीतच वर्तवला होता. त्यानुसार “एनओएए’च्या अभ्यासाने या अंदाजाला पुष्टी मिळाली आहे. दरम्यान, दुबईमध्ये युनायटेड नेशन्स क्लायमेट चेंज कॉन्फरन्स (सीओपी-28) होत आहे. तिच्या सुरुवातीला दि. 30 नोव्हेंबर रोजी “जागतिक हवामान-2023′ च्या पुरवणी अहवालात या उष्णतेच्या अंदाजाबाबत अधिकृत घोषणा केली जाणार आहे.
अनेक आंतरराष्ट्रीय डेटासेट वापरून जागतिक हवामानशास्त्र संस्थेने गेल्या आठवड्यात सांगितले होते, की यंदाचा ऑक्टोबर हा आतापर्यंतचा सर्वात उष्ण महिना राहिला आहे. यात सन 1991-2020 मधील सरासरीपेक्षा 0.85 अंश सेल्सिअस आणि मागील सर्वात उष्ण ऑक्टोबरपेक्षा 0.40 अंश सेल्सिअस अधिक तापमानाची नोंद केली आहे.
जानेवारी ते ऑक्टोबर 2023 चे जागतिक सरासरी तापमान हे रेकॉर्डवरील सर्वोच्च राहिले आहे. सन 1850-1900 पूर्वीच्या सरासरीपेक्षा 1.43 अंश सेल्सिअस आणि 2016 च्या दहा महिन्यांच्या सरासरीपेक्षा हे तामपान 0.10 अंश से. जास्त आहे. त्यामुळे हे प्रमाण आतापर्यंतचे रेकॉर्डवरील सर्वात उष्ण वर्ष राहिल्याचे म्हटले जात आहे.
सरासरी 1.34 अंश से. अधिक तापमान
174 वर्षांच्या जागतिक हवामानाच्या नोंदीमध्ये ऑक्टोबरमधील सरासरी तापमानाचा संदर्भ देताना “एनओएए’ने सांगितले की, ऑक्टोबर-2023 हा विक्रमी-उष्ण जागतिक तापमानाचा सलग पाचवा महिना होता. ऑक्टोबरचे सरासरी जागतिक तापमान विसाव्या शतकातील सरासरी 14 अंश सेल्सिअसपेक्षा 1.34 अंश सेल्सिअस अधिक नोंदवले गेले आहे.