जळोची : कोरोना हा बरा होणारा आजार आहे. मात्र त्यासाठी कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळून आल्यास किंवा त्रास जाणवू लागल्यास तात्काळ तपासणी करून उपचार करून घ्यावेत. नुकतीच कोरोनावर मात केलेल्या 87 वर्षीय लीलावती चिनके या वयोवृद्ध आजीने रुग्ण व नागरिकांना मोलाचा सल्ला दिला आहे.
सर्दी, खोकला, ताप ही पारंपारिक सामान्य आजाराची सामान्य लक्षणं. सध्या जीवघेण्या ठरत असलेल्या कोरोनाचीही हीच लक्षणे असल्याने नागरिकांमध्ये कोरोनाची प्रचंड भीती निर्माण झाली आहे. मात्र असे असले तरी इच्छाशक्तीच्या जोरावर वयोवृद्ध ही कोरोनावर मात करू शकतात. ही प्रेरणा देणारी किमया बारामती येथील लीलावती वसंतराव चिनके या 87 वर्षीय आजीने करून दाखवली आहे.
कोरोनाची लक्षणे जाणवू लागताच आजी लीलावती यांची कोरोना तपासणी केली असता, त्यांचा एच.आर.सि.टी. स्कोर 6 असल्याचा अहवाल प्राप्त होताच त्यांना तात्काळ दिनांक 15 एप्रिल रोजी बारामती येथील रुई ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथील डॉ. सुनील दराडे यांच्यासह त्यांचे सहकारी डॉक्टर व आरोग्य सेवकांच्या अथक प्रयत्नातून लीलावती आजींनी अवघ्या 10 दिवसात कोरोनावर यशस्वीरित्या मात केली. कोरोनाची भीती बाळगणाऱ्यांंनी व कोरोना बाधित रुग्णांनी या 87 वर्षीय वयोवृद्ध आजीची प्रेरणा घेऊन व आपल्यातील इच्छाशक्ती प्रबळ करून कोरोनावर मात करावी. याशिवाय कोरोनाची कोणतीही प्राथमिक लक्षणे दिसून आल्यास तात्काळ तपासणी करून योग्य उपचार घेणे गरजेचे आहे.
दरम्यान, आजींना त्रास जाणवू लागल्यानंतर त्यांचा मुलगा अनिल चिनके यांनी आजींना रुग्णालयात दाखल केले.चिनके यांनी त्यांची तपासणी केली असता ते ही पॉझिटिव्ह आढळून आले. हे दोघेही रुग्णालयात ऍडमिट असताना नातू व सून अत्यावश्यक कामानिमित्त पुण्यात होते. अशावेळी रुग्णांच्या नियमित उपचारासह डॉक्टर दराडे व त्यांच्या कुटुंबीयांनी आजीची 10 दिवसांच्या उपचारादरम्यान घरातील सदस्याप्रमाणे योग्य ती काळजी घेतल्याचे सांगून डॉक्टर दराडे यांचे आभार व्यक्त केले.
60 ते शंभरी पार केलेले रुग्ण होतात बरे…
महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये अनेक रुग्ण दगावताना दिसून येत आहे. मात्र कोरोनाला न घाबरता 60 ते 110 वर्षापर्यंत असणाऱ्या वयोवृद्धांनी सहज कोरोनावर मात केल्याची असंख्य उदाहरणे आहेत. त्यातच या 87 वर्षीय आजींचा समावेश आहे. वयोवृद्ध रुग्ण बरे होण्याचे प्रमाण पाहता कोणत्याही बाधित रुग्णाने घाबरून न जाता योग्य वेळी योग्य उपचार करून घेणे व कोरोनावर मात करणे गरजेचे आहे.