Pune Crime | बनावट ATM कार्डद्वारे नागरिकांचे पैसे लुटणारी नायजेरियन टोळी गजाआड; सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा लावून पकडले

पुणे, ता. 30 – एटीएममध्ये स्किमर व कॅमेरे बसवून त्याद्वारे नागरीकांच्या बॅंक खात्याची गोपनीय माहिती चोरुन बनविलेल्या बनावट एटीएम कार्डद्वारे नागरीकांचे पैसे लुटणाऱ्या नायझेरीयन नागरीकांना सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून बनावट एटीएम कार्ड, एटीएम कार्ड रिडर, सॉफ्टवेअर सिडी असा मुद्देमाल जप्त केला.

ननम गॅब्रीअल चुकुवूबुका (रा. औंध मिलटरी स्टेशन जवळ, पिंपळे निलख, मुळ रा. नायझेरीया), बशीर ऊर्फ लुकास विल्यम ऊर्फ ओमोईके गॉडसन (रा. जगताप डेअरीजवळ, रहाटणी, मुळ रा. नायझेरीया) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर पोलिसांकडे 28 एप्रिलरोजी एक तक्रार दाखल झाली होती. संबंधीत तक्रारदाराने त्यांच्या एटीएमकार्डचा वापर केलेला नसतानाही त्यांच्या बॅंक खात्यातील एक लाख 10 हजार रुपयांची रक्कम सलग तीन वेळा काढण्यात आली होती.

संबंधीत व्यवहार हे नाशिक फाट्यावरील कासारवाडी येथील धर्मवीर संभाजी अर्बन बॅंकेच्या एटीएम सेंटरमधून सायंकाळी पाच ते सहा या वेळेत झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, सायबर पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू होता. त्यानंतर सायबर पोलिसांनी तक्रारदारासमवेत जाऊन 29 एप्रिल रोजी संबंधीत एटीएमभोवती सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास सापळा लावला.

त्यावेळी दुचाकीवरुन आलेला एक नायझेरीयन व्यक्ती एटीएममध्ये जाऊन बनावट एटीएम कार्डचा वापर करून पैसे काढत असताना पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. त्याची झडती घेतल्यानंतर त्याच्याकडे बनावट एटीएम कार्ड, एटीएम कार्ड रिडर, सॉफ्टवेअर सिडी इत्यादी साहित्य दिसून आले. याप्रकरणी अधिक तपास सायबर पोलिस करत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.