लाहोर – इशनिंदेच्या आरोपावरून मानसिक विकृती असलेल्या एका व्यक्तीची जमावाकडून हत्या झाल्याप्रकरणी किमान 85 जणांना अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील खानेवल जिल्ह्यातल्या एका गावात रविवारी ही घटना घडली होती. या प्रकरणी व्हिडीओ तित्रीकरणाच्या आधारे अधिक जणांना अटक करण्याची आणि ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
धर्मग्रंथाची विटंबना केल्याच्या आरोपावरून जमावाने जंगल डेरा या गावात एका मध्यमवयीन व्यक्तीची हत्या केली होती. संध्याकाळच्या प्रार्थनेच्यावेळी या व्यक्तीने धर्मग्रंथाची विटंबना केल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर तणाव निर्माण झाल्याने तेथे पोलीस पोचले होते. त्यांनी या युवकाला ताब्यातही घेतले होते. मात्र संतप्त जमावाने या युवकाला आपल्या ताब्यात घेतले आणि त्याला झाडाला लटकावून दगड विटांनी मारहाण केली होती. आपण निर्दोष असल्याचे हा युवक म्हणत होता. मात्र त्याच्याकडे कोणीही लक्ष देत नव्हते.
पंजाबचे मुख्यमंत्री उस्मान बुझदारी यांनी पोलीस महानिरीक्षकांकडून या प्रकरणाचा अहवाल मागवला होता. पंतप्रदान इम्रान खान यांनीही या प्रकरणाची दखल घेऊन सखोल तपासाचे आदेश दिले होते.