नवी दिल्ली – हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबरला दक्षिण इस्रायलमध्ये केलेल्या हल्ल्याच्यावेळी लैंगिक अत्याचारही केले होते, असे पुरावे संयुक्त राष्ट्राने केलेल्या तपासाच्यावेळी आढळून आले आहेत. संयुक्त राष्ट्राच्या विशेष तपास पथकाने अलिकडेच इस्रायलमधील या भागाचा दौरा केला. त्यावेळी हे पुरावे मिळाले असल्याचे या पथकाच्या प्रमुख प्रमिला पट्टन यांनी सांगितले. हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायली महिलांवर बलात्कार आणि लैंगिक अत्याचार केले होते, असा निष्कर्ष असलेला अहवाल पट्टन यांच्या पथकाने संयुक्त राष्ट्रात सादर केला आहे.
पीडीत महिलांनी पुढे येऊन याविषयीची तक्रार नोंदवावी, असे वारंवार आवाहन केल्यानंतरही इस्रायलमधील महिला या पथकासमोर आल्या नाहीत. पथकाला मिळालेले पुरावे परस्थितीजन्य असल्याचे पट्टन यांनी सांगितले. या तपास पथकाने काही साक्षीदार, हल्ल्यात बचावलेल्या व्यक्ती, सुटका झालेले ओलीस नागरिक, आरोग्य सेवक आणि अन्य लोकांच्या मुलाखती घेऊन आपले निष्कर्ष काढले आहेत. हमासच्या हल्ल्यानंतर जवळपास ५ महिन्यांनी हा अहवाल तयार करण्यात आला आहे. हमासच्या या हल्ल्यात १,२०० जण ठार झाले होते आणि २५० जणांचे हमासने अपहरण केले होते.
आगामी रमझानच्या पवित्र महिन्यात गाझामध्ये युद्धविराम लागू करण्याबाबत कैरोमध्ये चर्चा सुरू आहे. हा युद्धविराम घडवून आणण्यासाठी अमेरिकेच्या उपाध्यक्षा कमला हॅरिस यांनी देखील आग्रह धरला आहे. इस्रायलने केलेल्या वॉर कॅबिनेटचे सदस्य संयुक्त राष्ट्राचे पदाधिकारी आणि हॅरिस यांच्या संपर्कात आहेत.
दुसरीकडे गाझामध्ये मदत उपलब्ध करून देणार् या संयुक्त राष्ट्राच्या एजन्सीमध्येच ४५० दहशतवादी आहेत, अशी टीका इस्रायलने सुरू केली आहे. दुसरीकडे गाझा पट्ट्यातील खान युनिस भागात इस्रायलने केलेल्या हल्ल्यात १७ पॅलेस्टिनी ठार झाल्याचे पॅलेस्टिनी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.