संसर्गाचा धोका कायमच; 24 तासांत 4 मृत्यू : 176 जण झाले बरे
आणखी 49 जणांची प्रकृती चिंताजनक
पुणे – शहरात सोमवारी दिवसभरात नवीन 78 करोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्यामुळे बाधितांची एकूण संख्या 1,220 वर पोहचली आहे. गेल्या चार दिवसांपासून बाधितांची संख्या दररोज 70 ते 90 ने वाढत आहे. तर, दुसऱ्या बाजूला गेल्या 24 तासांत शहरात करोनाचे 4 बळी गेले आहे. त्यामुळे शहरातील मृतांची संख्या 80 वर गेली आहे. मृतांमध्ये 38 ते 64 वयोगटातील व्यक्तींचा समावेश आहे.
शहरातील विविध रुग्णालयात एकूण 821 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यातील 49 जणांची प्रकृती गंभीर असून, ससून रुग्णालयात 30, भारती हॉस्पीटलमध्ये 7, सिम्बॉयसिस मध्ये 5, नायडू 3, जहांगीर 2, कर्वेरोड येथील सह्याद्री रुग्णालयात, काशीबाई नवले आणि नोबेल रुग्णालयात प्रत्येकी 1 रुग्णाची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, आजपर्यंत 176 जणांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत 7 हजार 675 जणांची तपासणी करण्यात आली असून, त्यातील 6 हजार 558 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. 921 जणांना विलगीकरण कक्षात दाखल केले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, मृतांमध्ये गेल्या 24 तासांत तीनही बळी ससून रुग्णालयातील आहेत. त्यामध्ये दोन महिला आणि एक पुरुष आहे. घोरपडी पेठेत राहणाऱ्या 64 वर्षीय महिलेला 18 एप्रिल रोजी ताप आल्यामुळे ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. 23 तारखेला त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. मात्र, त्यांना उच्चरक्तदाब आणि मधुमेहाचा आजार असल्यामुळे रविवारी (दि.26) रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. कोंढवा परिसरात राहणाऱ्या 38 वर्षीय व्यक्तीला 19 एप्रिल रोजी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचे नमुने घेतले असता, अहवाल पॉझिटिव्ह आला; परंतु, त्यांना मधुमेह आणि किडनीचा त्रास असल्यामुळे आज सकाळी मृत्यू झाला. पर्वती येथील महिलेचाही दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना 16 एप्रिलला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना मधुमेह, उच्चरक्तदाबाचा त्रास होता.