पुणे -जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिकांसाठी 73 चालकांच्या कंत्राटीतत्त्वावरील नियुक्तीला जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली. त्यामुळे नियुक्ती प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात 124 प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर असून, 101 प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यरत आहेत. त्यात 93 रुग्णवाहिका असून 93 कंत्राटी वाहनचालकांचे मानधन राज्य सरकारच्या निधीतून दिले जाते. करोनाकाळात 14 व्या वित्त आयोगातून 77 रुग्णवाहिका खरेदी केल्या.
करोनाग्रस्तांना अत्यावश्यक आरोग्य सेवा देण्यासाठी आरोग्य केंद्रस्तरातून रुग्ण कल्याण समितीच्या शिफारशीवरून कंत्राटी वाहनचालकांची नियुक्ती करण्यात आली. सध्या 63 कंत्राटी वाहनचालकांचे मानधन हे ग्रामविकास विभागाकडून मंजूर केलेल्या दोन कोटी रुपयांच्या रकमेतून देण्यात येत आहे.
करोनाकाळात रुग्णांना 174 रुग्णवाहिका सेवा देत आहेत.त्यापैकी चार रुग्णवाहिका कंपन्यांचे उत्तरदायित्व (सीएसआर) निधी आणि आमदारनिधीतून देण्यात आले आहे. त्यातील 101 वाहनचालक पदे मंजूर असून 73 पदे तात्पुरती मंजूर करणे गरजेचे आहे. यासंदर्भात आरोग्य विभागाने बांधकाम व आरोग्य समितीच्या बैठकीत प्रस्ताव मान्यतेसाठी ठेवला होता. त्याला मान्यता देण्याचा ठराव करण्यात आला. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेतही कंत्राटी चालकांच्या नियुक्तीच्या मान्यतेचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता.
चालकांना दरमहा 14 हजार 200 रुपयांचे वेतन दिले जात आहे. त्यासाठी खासगी एजन्सीकडून हे मानधन चालकांच्या खात्यात जमा केले जाते. त्याकरिता त्यांच्या वेतनातून भविष्य निर्वाह निधीसह आदी रक्कम कपात केली जाते. त्या अनुषंगाने 17 हजार 500 रुपयांची एकूण रक्कम एका चालकामागे एजन्सीला जिल्हा परिषदेकडून देण्यात येते. प्रत्येक चालकाला समाधानकारक वेतन मिळावे. त्यामुळे या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे.
– आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी