रायपूर – छत्तीसगड राज्यातही करोनाचे पेशंट वाढत असून त्या राज्यातील रुग्णांची व्यवस्था करण्यासाठी आणि हॉस्पिटल्समधील व्यवस्थेसाठी सातशे कोटी रुपयांची मदत करावी, अशी मागणी छत्तीसगड सरकारने केंद्र सरकारकडे केली आहे. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी तसे पत्र आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांना पाठवले आहे.
रायपूर येथील एम्स रुग्णालयातील आयसीयू बेड्सची संख्या वाढवण्याची मागणीही त्यांनी या पत्रात केली आहे. छत्तीसगडमध्ये सध्या कोविडसाठी स्वतंत्र अशी 29 हॉस्पिटल्स असून 221 केअर सेंटर्स आहेत. त्यात 29 हजार 111 रुग्णांची सोय होऊ शकते.
त्यातील आयसीयूमध्ये 406 खाटा उपलब्ध असून 370 हाय डिपेंडेन्सी युनिट्स आहेत. या रुग्णालयांसाठी राज्य सरकारने केंद्राकडे 821 कोटी 93 लाखांची मागणी केली होती त्यापैकी केंद्राने केवळ 85 कोटी रुपये दिले आहेत. उर्वरित 736 कोटी रुपयेही छत्तीसगडला त्वरित दिले जावेत, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली आहे.