नारायणगाव -वारूळवाडी (ता. जुन्नर) ग्रामपंचायतीच्या हद्दीत शनिवारी (दि. 12) 13 हजार 843 नागरिकांची कोविड आरोग्य तपासणी करण्यात आली. यात 24 जण पॉझिटिव्ह तर 240 जण संशयित आढळून आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ यांनी दिली.
वारूळवाडी हद्दीत सुमारे 14 हजार 253 पैकी 13 हजार 843 नागरिकांची ऑक्सिजन, थर्मल स्कॅनिंग स्टेट करण्यात आली. यासाठी 77 पथके तयार केली होती. परिसरातील शिक्षक, प्राथमिक केंद्राचे आरोग्य कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, पोलीस पाटील, आम्ही वारूळवाडीकर ग्रुप यांच्या सहकाऱ्याने ही तपासणी केली आहे.
यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे, तहसीलदार हणमंत कोळेकर, सभापती विशाल तांबे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमेश गोडे, गटविकास अधिकारी हेमंत गरीबे, सहायक पोलीस निरीक्षक डी. के. गुंड, संजय वारुळे, सतेज भुजबळ आदींनी भेट देऊन आढावा घेतला.