कोल्हापूर – शिंदे गटाचे ७ खासदार भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याचा दावा माजी मंत्री आणि काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी केला आहे. तसे लेखीही या खासदारांनी दिल्याचे सतेज पाटील यांनी म्हटले आहे. सतेज पाटलांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान पाटील पुढे बोलताना म्हणाले की, सध्या कोल्हापूर मतदारसंघात ५ जण इच्छुक आहेत. जागा निश्चित झाल्यानंतर महाविकास आघाडीतील पक्षाशी चर्चा करून उमेदवार ठरवला जाईल. मग या लोकसभेसाठी सप्राईज चेहरा येऊ शकतो. याठिकाणी निवडून येणारा उमेदवार आम्ही देणार आहोत, असे म्हणत सतेज पाटील यांनी कोल्हापूर लोकसभा जागेसाठी सस्पेन्स आणखी वाढवला आहे.
सतेज पाटील यांनी आज कोल्हापुरात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेना सोडून गेलेल्या व महायुतीच्या सत्तेत सामील झालेल्या शिंदे गटातील सात खासदारांनी भाजपच्या तिकिटावर लढण्याचे लेखी दिले आहे. १० जानेवारीच्या आमदार पात्रतेवर सर्व निर्णय अवलंबून आहे.
तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात देखील महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी निवडणूक लढवावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. या संदर्भात राजू शेट्टी यांच्याशी दोन वेळा प्राथमिक चर्चा झालेली आहे. शेवटपर्यंत आम्ही त्यांना आमच्या सोबत घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसेच जागावाटपाचे सूत्र ठरल्यानंतर तत्काळ उमेदवारी देण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले आहेत.
शिवसंकल्प यात्रेवर टिका
ठाकरे गटाने सुरु केलेल्या संकल्प यात्रेवर टिका करता ते म्हणाले, शिवसंकल्प यात्रेतून काय विकल्प मिळाला हे लोकांना अजूनही कळलेले नाही त्यामुळे नवीन यात्रेतून जनतेला काय मिळणार आहे ? असा टोलाही सतेज पाटील यांनी हाणला.