67 वर्षांपूर्वी प्रभात: शुक्रवार ता. 14 माहे ऑगस्ट सन 1953

येत्या रविवारी दिल्लींत भारत-पाक पंतप्रधान भेट 

काश्‍मीर प्रश्‍नांबाबत चर्चा होणार 

पाक वृत्तपत्रांवर नेहरूंची कडक टीका

नवी दिल्ली, ता. 13 : पाकचे पंतप्रधान जनाब महंमद अली हे भारताचे पंतप्रधान पंडित नेहरू यांजबरोबर चर्चा करण्यासाठीं येत्या रविवारी येथें येणार आहेत असें सरकारी-रीत्या कळतें.
काश्‍मीर प्रश्‍नाबाबत पंडित नेहरूंशी चर्चा करण्यासाठीं आपण रविवारी दिल्लीत जात असून आवश्‍यक तेवढे दिवस आपण तेथें राहणार आहें असें पाक पंतप्रधान जनाब महंमद अली ह्यांनीं आज कराची येथें पत्रकारांस सांगितले.

पाक पंतप्रधान भारत-पाकमधील वादग्रस्त प्रश्‍नांबाबत चर्चा करण्यासाठी रविवारी येथे येत असून त्यांचे सर्वांनी स्वागत करावें असें पंडित नेहरूंनी आज कॉंग्रेस पक्षाच्या सभेत सांगितले.

काश्‍मीर घडामोडींबाबत असत्य आणि आगलाव्या बातम्या पाक वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केल्याबद्दल पंडित नेहरूंनी कडक टीका केलीं.


कोरिया राजकीय परिषदेचा दरवाजा हिंदुस्थानला बंद

न्यूयॉर्क, ता. 13 :कोरियन शस्त्रसंधीनंतर 90 दिवसांच्या आत भरणाऱ्या राजकीय परिषदेत कोणकोणत्या राष्ट्रांनी भाग घ्यावा याबद्दल येथें अँग्लो-अमेरिकनांची मोठी झोंबाझोंबी सुरू झालेली आहे. हिंदुस्थानला या राजकीय परिषदेंत भाग घेऊ देऊ नयें असें आडमुठें धोरण अमेरिकेनें अंगीकारले आहे.

उलट ब्रिटननें हिंदुस्थानला या परिषदेचें निमंत्रण द्यावें, असें सुचविलें आहें. रशियाचे स्थान कोरियन युद्धात अमेरिकेच्या बाजूने लढलेल्या 16 राष्ट्रांनी या परिषदेत भाग घ्यावा, यासंबंधी केव्हाच एकमत होऊन चुकलें आहें. या परिषदेंत कोणी भाग घ्यावा, याचा निर्णय राष्ट्रसंघानेच करावा, असा आता अमेरिकेने आग्रह धरला आहे.

कोरियन हद्दीला रशियाची हद्द भिडलेली असल्यानें रशियाचा कोरियाशीं संबंध येतो व म्हणून कोरियन राजकीय परिषदेंत रशियाला भाग घेऊ द्यावा, हे मात्र अमेरिकेला एकदम मान्य आहें. या साऱ्या प्रश्‍नांवर अमेरिकन, ब्रिटन आणि फ्रान्स या देशांच्या प्रतिनिधींचा साकल्यानें विचार चालू आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.