कलंदर: गावाकडे येणाऱ्यांचे स्वागत…

उत्तम पिंगळे

बऱ्याच दिवसांनी आत्याला भेटायला तिच्या गावी गेलो होतो. आत्यालाही खूप बरे वाटले. गेले पाच-सहा महिने तर कोण कोणाकडे जात नव्हते. सायंकाळी पारावर मिटिंग आहे, सरपंचांनी ठेवली आहे म्हणून आते भावाबरोबर मीही गेलो.

गावकरी वडाच्या पाराच्या आसपास जमले होते. इतक्‍यात सरपंच व शाळेचे गुरुजीही आले. सरपंचांनी बोलायला सुरुवात केली, “आपल्याला माहीतच आहे की ही मिटिंग कशाकरता बोलविली आहे’. तेवढ्यात मारुती उभा राहिला व सरपंचांना म्हणू लागला, “मी म्हणतो, पण गेले पाच महिने कोणी बी गावी आला नाय, मग आताच कशाला यायला हवाय?’ त्याला गप्प करत सदा म्हणू लागला, “अरे मारत्या, तू एकटा सडाफटिंग नुसता माडावाणी वाढला आहेस, तुला काय गणपती हाये का नाय?

तुला काय फरक पडणार आहे? कुणी आला काय आणि नाय आला काय?’ मारुती सदावर डाफरला, “अरे सदा, तू कशाला गमजा करतोस? मला माहीत है तुझे दोन भाव मुंबईहून येतील आणि तू काय करणार फक्‍त घर सारवून ठेवणार, बाकी तेल पाणीपासून गणपतीचा प्रसाद घराच्या वस्तू, चहा, दूध, पेढे, खाऊ, फरसाण, कागदाच्या प्लेटी बी तुझे भाऊ घेऊन येणार. डेकोरेशन लायटिंग सर्व पूजेचे सामान मुंबईहून येणार तू काय करणार आहेस? तुला सर्व आयते मिळणाऱ हाय म्हणूनच तुझे भाऊ इथे यायला तुला हवे आहेत? मे महिन्यात आंबे खायला कुणी आले होते का? नाही. मग चार पेट्या तरी मुंबईला धाडण्यास का?’ सदा जागेवरून उठू लागला एवढ्यात सरपंच व गुरुजींनी त्याला थांबवले.

सरपंच मारुतीला म्हणाले, “अरे गप्प रवा आता, असले विषय काढू नका. आता मिटिंग सुरू करायची आहे’. मारुती म्हणाला, “चाकरमान्यांना मुंबईहून येथे आणण्याला माझा विरोध आहे आणि तुम्हाला याऊन द्यायचा असेल तर प्रत्येकाकडून दोन हजारांची पावती फाडून घ्या. गावाला तेवढी मदत होईल’. त्याला खाली बसवून सरपंच सांगू लागले, “गणपती आणि होळी हे दोन महत्त्वाचे सण आहेत. ज्यावेळी चाकरमानी आवर्जून आपल्या गावी येत असतात.

यावेळी करोनामुळे मे महिन्यात कुणी आले नाही, हे खरे आहे. पण गणपती हे आपल्या आराध्यदैवत आणि अशा वेळी आपण त्यांना येऊ नका म्हणणे चुकीचे ठरेल. (सर्वांनी माना डोलावल्या) आणि बा मारत्या तू पावती फाडा म्हणतोस? आणि मागे ग्रामदेवतेच्या देवस्थानाचा जीर्णोद्धार करायला चाकरमान्यांनीच पैसे दिले होते ते सर्व इसरला होय?’ मारुती गप्प झाला. मग सरपंचांनी प्रस्तावित नियमावली गुरुजींना वाचून दाखवायची विनंती केली.

गुरुजींनी वाचावयास सुरुवात केली, “गणपतीच्या वेळी जे चाकरमानी गावी येथील त्यांना सात दिवस घरामध्येच क्वारंटाइन राहावे लागेल. पंधरा ऑगस्टपासून जर येतील त्यांच्या क्वारंटाइन कालावधी एकवीस तारखेला समाप्त होऊन ते नेहमी प्रमाणे गणपती उत्सवात सामील होऊ शकतील. सोळा तारखेपासून येणाऱ्यांना एक एक दिवस पुढे जाईल याची नोंद घ्यावी. आयत्या वेळी गणपतीच्या दिवशी येणाऱ्यांना सात दिवस त्यांच्याच घरात राहावे लागेल, याची नोंद घ्यावी.

चाकरमान्यांनी घरी फोन करून काय काय वस्तू आणाव्या लागतील ते नीट विचारून घ्यावे. कारण बहुतेक सारे मुंबईहूनच आणावे लागेल. साबण, सॅनिटायझर सोबत घेऊन येणे’.
गणपतीसाठी गावाकडे येणाऱ्यांचे हार्दिक स्वागत! ही सूचना फोटो काढून मोबाइलवरून सर्वांनी चाकरमान्यांना पाठवावे, असे ठरले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.