सिमला – हिमाचल प्रदेशात विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी सुमारे 66 टक्के मतदान झाले. कडाक्याच्या थंडीची बिल्कूल पर्वा न करत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदारांनी प्रसंगी बर्फाच्छादित रस्त्यांवरून पायपीट केली.
हिमाचलात विधानसभेच्या एकूण 68 जागा आहेत. त्यासाठी एकाच टप्प्यात मतदानाची प्रक्रिया झाली. त्या राज्यातील एकूण 55 लाखहून अधिक मतदारांपैकी सुमारे दोन-तृतीयांश जणांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे निवडणुकीत रिंगणात उतरलेल्या एकूण 412 उमेदवारांचे भवितव्य इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये (ईव्हीएम) बंद झाले.
मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी निकालासाठी हिमाचलला जवळपास महिनाभराची प्रतीक्षा करावी लागेल. गुजरातबरोबरच तेथील निकाल 8 डिसेंबरला जाहीर होईल.
हिमाचलमध्ये सध्या भाजपची सत्ता आहे. त्या राज्यात भाजप आणि कॉंग्रेस या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्येच प्रमुख लढत अपेक्षित आहे. अर्थात, आपच्या एन्ट्रीमुळे निवडणूक तिरंगी ठरली का ते निकालातूनच समोर येईल.
हिमाचलची सत्ता आलटून-पालटून भाजप आणि कॉंग्रेसकडे जाते. ती परंपरा कायम राहणार की मोडीत निघणार याविषयी मोठे औत्सुक्य आहे.