नगर -करोना विषाणूच्या संसर्गापासून बचावासाठी प्रत्येकाला स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. सध्यातरी हाच एकमेव पर्याय आहे, असे मत साईदीप हॉस्पिटलचे संचालक डॉ. एस. एस. दीपक यांनी व्यक्त केले.
अहमदनगर प्रेस क्लब व साईदीप हॉस्पिटल यांच्यातर्फे आज पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. प्रेस क्लबचे अध्यक्ष शिवाजी शिर्के, डॉ. निसार शेख, डॉ. रवींद्र सोमाणी, डॉ. एस. एम. इक्बाल, डॉ. अनिकेत कुजहाडे, डॉ. आश्विन झालाणी, डॉ. पायल धूत आदी यावेळी उपस्थित होते.
डॉ. दीपक म्हणाले, “”करोना विषाणूमुळे प्रत्येकाची जीवनशैली बदलून गेली आहे. हा बदल प्रत्येकाने आत्मसात करावा. दररोज नियमित व्यायाम करावा, नाक, कान, डोळे यांना स्पर्श न करणे आणि शरीराची काळजी याकडे कटाक्षाने लक्ष्य द्यावे.” डॉ. सोमाणी यांनीही मार्गर्शन केले. प्रेस क्लबचे अध्यक्ष शिर्के यांनी प्रास्ताविक केले. यावेळी डॉ. शेख व प्रेस क्लबचे उपाध्यक्ष अरुण वाघमोडे यांनीी मनोगत व्यक्त केले. साईदीप हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी संजीव दायमा यांनी सूत्रसंचालन केले. या शिबिरात पत्रकारांची फुफ्फुसाची क्षमता, एसपीओ-टू, शरीराचे तापमान, ब्लड प्रेशर, शुगर आदी तपासण्या करण्यात आल्या.
पत्रकारांच्या पत्नींसाठीही शिबीर
साईदीप हॉस्पिटलमध्ये 29 व 30 मे रोजी पत्रकारांच्या पत्नींसाठीही सकाळी 11 ते 2 यावेळेत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात येणार असल्याचे हॉस्पिटलचे संचालक डॉ. एस.एस. दीपक यांनी सांगितले. पत्रकारांसाठी बुधवारी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत हे शिबिर सुरू राहणार आहे.