सातारा -जिल्ह्यात डोळे येण्याची साथ जोरात असून मोठ्या प्रमाणात रुग्णांमध्ये ही लक्षणे दिसू लागली आहेत. फलटण व सातारा तालुक्यात या रुग्णांनी शंभरी पार केली असून जिल्ह्यात 636 नागरिकांचे डोळे आले आहेत. 258 रुग्ण उपचारद्वारे बरे झाले असून सध्या 378 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
जावळी 24, कराड 74, खंडाळा 63, खटाव 50, कोरेगाव 68, महाबळेश्वर 7, माण 25, पाटण 32, फलटण 103, सातारा 102, वाई 88 अशा 636 नागरिकांचे डोळे आले आहेत. यापैकी जावळी 9, कराड 16, खटाव 12, कोरेगाव 24, महाबळेश्वर 1, माण 2, पाटण 11, फलटण 101, सातारा 79, वाई 3 असे 258 रुग्ण पूर्णत: बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्य विभागातून देण्यात आली.
जिल्ह्यात बहुतांश भागात लोकांना डोळे येण्याची लागण होत आहे. हा आजार गंभीर स्वरुपाचा नसून योग्य ती काळजी घेतल्यास व त्वरीत डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार केल्यास हा आजार लगेच बरा होतो. क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयातील डोळ्याचा विभाग तसेच ग्रामीण स्तरावर ग्रामीण रुग्णालयांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये यासाठी पूर्णतः मोफत उपचार उपलब्ध आहेत,
डोळे आल्यास डोळ्याच्या डॉक्टरांकडे तपासणी करावी, डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे औषधोपचार करावा, डोळ्यांना स्वच्छ पाण्याने दिवसातून तीन ते चार वेळा धुवावे व स्वच्छ कपड्याने पुसावेत, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे यांनी केले आहे.
डोळे येण्याची लक्षणे- डोळ्यांना सूज येणे, डोळ्यांमधून पाणी गळणे, डोळे लाल होणे, डोळ्यांना खाज येणे, पापण्या चिकटवणे, डोळ्यातून चिकट पिवळा, पांढरा रंगाचा द्रव बाहेर येणे, डोळ्यांमध्ये आग होणे, डोकेदुखी, कान जवळचा भाग सुजणे किंवा कान दुखी, प्रकाशामुळे डोळ्यांना होणारा त्रास. डोळे येण्याचे कारणे- डोळ्याचा विषाणूजन्य संसर्ग मुख्यत्वे डिनो व्हायरसमुळे होतो. डोळे आलेल्या व्यक्तींच्या सहवासात आल्यामुळे संसर्ग वाढत जातो. डोळे आलेल्या व्यक्तीचा हात, रुमाल, टॉवेल, चष्मा, ब्युटी क्रीम, काजळ किंवा साबण इत्यादी वस्तूंमुळे संसर्ग होऊ शकतो.
अशी घ्यावी काळजी
डोळे आल्यावर सतत डोळ्यांना हात लावू नये, डोळे पुसण्यासाठी स्वच्छ कपड्याचा वापर करावा, डोळ्यांना हात लावल्यावर लगेच साबण लावून हात धुवावेत, साधा कोणताही पण स्वच्छ असा चष्म्याचा वापर करावा. धूर, हवा, लाईटचा प्रकाश यांचा सहवास टाळावा. शाळा, वसतिगृहे या संस्थात्मक ठिकाणी अशी लक्षणे अथवा साथ आली असेल तर डोळे आलेल्या व्यक्तीबाबत डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली योग्य ती खबरदारी घ्यावी.