वाई -मेणवली (ता. वाई) येथील हॉटेल मालकास खंडणी मागितल्याप्रकरणी अटकेत असलेला आणि मोक्काची कारवाई झालेला अनिकेत उर्फ बंटी नारायण जाधव (रा. भुईंज) व त्याच्या सहकाऱ्यावर आज वाई न्यायालयातील व्हरांड्यात गोळीबार झाला. यामध्ये दोन राऊंड फायर झाले. परंतु, कोणालाही दुखापत झाली नाही. गोळीबार करणाऱ्या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मेणवली (ता. वाई) येथील हॉटेल माधवन इंटरनॅशनलच्या मालकास खंडणी मागितल्याप्रकरणी कुख्यात गुंड अनिकेत उर्फ बंटी जाधव, निखिल मोरे, अभिषेक मोरे यांना शनिवारी (दि. 5) न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर आज सोमवारी कोठडी संपल्यानंतर त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यासाठी आणले होते. संशयितांना जिल्हा सत्र न्यायाधीशांच्या कक्षाबाहेरील व्हरांड्यात बसविण्यात आले होते. त्यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही लावण्यात आला होता. त्याचवेळी अचानक वकिलाच्या वेशात आलेल्या राजेंद्र चंद्रकांत नवघणे याने फाईलमधून पिस्तुल काढून आरोपींच्या दिशेने गोळीबार केला. तेथे बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवत नवघणे यास पकडले.
तोवर त्याने दोन गोळ्या झाडल्या होत्या. पैकी एक गोळी भिंतीवर तर दुसरी जमिनीवर लागली. यावेळी राजेंद्र नवघणे खंडणी प्रकरणातील फिर्यादीच असल्याचे निदर्शनास आले. या घटनेनंतर न्यायालय व आवार पूर्ण बंद करून घेत पोलिसांनी तपास सुरु केला. तसेच वाई शहरात नाकाबंदी करण्यात आली होती. मुख्य जिल्हा न्यायाधीश हतकर यांनी वाई न्यायालयात जाऊन घटनेची माहिती घेऊन सर्व न्यायाधीशांची विचारपूस केली. पोलीस अधीक्षक समीर शेख, परिविक्षाधिन पोलीस अधीक्षक कमलेश मीना, अतिरीक्त पोलीस अधीक्षक बापू बांगर, उपअधीक्षक बाळकृष्ण भालचीम, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, कृष्णराज वाळुंज यांनी घटनास्थळाची पाहणी केली व परिस्थिती नियंत्रणात आणली. रात्री उशिरापर्यंत या गुन्ह्याची नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती.
कर्मचाऱ्याचे प्रसंगावधान
वाई न्यायालयातील या घटनेच्या वेळी एका पोलीस कर्मचाऱ्याच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला, असे जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी पत्रकारांना सांगितले. या कर्मचाऱ्याने हल्लेखोराच्या हाताला धक्का दिल्यामुळे एक गोळी भिंतीवर व एक जमिनीवर गेली, असे त्यांनी स्पष्ट केले. गोळीबार करणाऱ्या एका संशयिताला ताब्यात घेतले असून यात आणखी कोणी आहे का, अधिक तपास सुरु आहे, असे श्री. शेख यांनी सांगितले.