पुणे – शहरातील करोनामुक्त व्यक्तींची वाढती संख्या दिलासा देणारी आहे. आज (दि. 19) दिवसभरात 1 हजार 89 बाधित करोनामुक्त झाले असून, आतापर्यंत सापडलेल्या एकूण 77 हजार 368 बाधितांपैकी तब्बल 60 हजार 963 बाधित ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. दरम्यान, नव्याने 1 हजार 211 बाधित सापडले आहेत. तर गेल्या 24 तासात 35 जणांचा मृत्यूची नोंद झाली असून, मृतांची संख्या 1 हजार 849 वर पोहोचली आहे.
शहरात बाधित संख्या 500 ते 600 कमी झाली आहे. मात्र, अत्यवस्थ बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे मृत्युचा कहर सुरूच आहे. सद्यस्थितीत 815 बाधित अत्यवस्थ असून, त्यातील 483 जणांना व्हेंटिलेटर लावण्यात आला आहे. तर 332 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. शहरातील विविध रुग्णालयात 14 हजार 556 बाधितांवर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, कालपासून नमुने तपासणीच्या संख्येत वाढ झाली आहे. आज 6 हजार 690 संशयितांची तपासणी (स्वॅब आणि ऍन्टीजेन) करण्यात आली असून, आतापर्यंत तब्बल 3 लाख 77 हजार 81 संशयितांची तपासणी करण्यात आली आहे.