राज्यात 60.5 टक्के मतदान

सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 60.25 टक्के मतदान
नवी दिल्ली : राज्यात विधानसभेच्या 288 जागांसाठी सायंकाळी 6 वाजेपर्यंत 60.5 टक्के मतदान झाले असून सातारा लोकसभा पोट निवडणुकीसाठी 60.25 टक्के मतदान झाल्याची माहिती भारत निवडणूक आयोगाचे निवडणूक उपायुक्त चंद्रभूषण कुमार यांनी आज येथे दिली.

महाराष्ट्र आणि हरियाणा राज्यात आज पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांसह विविध राज्यांतील विधानसभा व लोकसभा पोटनिवडणुकांविषयी माहिती देण्यासाठी भारत निवडणूक आयोगात आयोजित पत्रकार परिषदेत चंद्रभूषण कुमार यांनी ही माहिती दिली. आयोगाचे वरिष्ठ निवडणूक उपायुक्त उमेश सिन्हा, डॉ. संदीप सक्‍सेना आदि यावेळी उपस्थित होते.

महाराष्ट्रात पावसाळी वातावरणाच्या पार्श्वभूमीवर चांगले मतदान झाले असून 6 वाजेपर्यंत प्राप्त माहिती नुसार 60.5 टक्के झाल्याची माहिती आहे मात्र अजून मतदान केंद्रावर मतदानाच्या रांगा आहेत व त्यानंतर अंतिम मतदानाचा आकडा स्पष्ट होईल असेही चंद्रभूषण यांनी यावेळी सांगितले. राज्यात 2014 च्या विधानसभा निवडणुकीत 63.08 टक्के मतदान झाले होते. यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत 60.79 टक्के मतदान झाले होते असे सांगून आजच राज्यात पार पडलेल्या सातारा लोकसभा पोट निवडणुकीसाठी 6 वाजेपर्यंत प्राप्त माहिती नुसार 60.25 टक्के मतदान झाल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात 24 ऑक्‍टोबर रोजी 288 मतमोजणी केंद्रांवर मतगनना पार पडणार असून प्रत्येक केंद्रासाठी एक असे एकूण 288 मतगनना निरीक्षकांच्या देखरेखीत ही प्रक्रिया पार पडणार असल्याचे चंद्रभूषण कुमार यांनी सांगितले.
दरम्यान, राज्यात निवडणूक कालावधित 41 हजार 910 अजामीनपत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून 2 हजार 762 मतदान केंद्र संवेदनशील मतदान केंद्र म्हणून घोषित करण्यात आले होते असे ही त्यांनी सांगितले. राज्यात 49 हजार 284 इमारतींमध्ये 96 हजार 661 मतदान केंद्र स्थापन करण्यात आली होती यातील 352 मतदान केंद्र ही पूर्णपणे महिलांद्वारे संचलीत करण्यात आली.

निवडणूक कालावधीत महाराष्ट्रात पेडन्युजचे एकूण 32 प्रकरण नोंद झाल्याचे भारत निवडणूक आयोगाचे माध्यम महासंचालक धिरेंद्र ओझा यांनी सांगितले. हरियाणात 33 महाराष्ट्रात 32 आणि राजस्थान मध्ये 1 अशा पेड न्युजच्या एकूण 66 प्रकरणांची नोंद झाल्याचे ओझा यावेळी म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.