धनंजय मुंडे यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

सुनावणी दोन आठवडे पुढे ढकलली
नवी दिल्ली : राज्यात एकीकडे विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची लगबग असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. बीड येथील जगमित्र साखर कारखान्याच्या जमीन घोटाळा प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने ही सुनावणी दोन आठवडे पुढे ढकलली आहे. परिणामी, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंडे यांच्यावरील कारवाईची टांगती तलवार दूर झाली आहे.

मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. मात्र, औरंगाबाद खंडपीठाच्या या आदेशावर सुप्रीम कोर्टाने स्थगिती आणली होती. त्यानंतर कोर्टाने याप्रकरणाची पुढील सुनावणी 21 ऑक्‍टोबर रोजी म्हणजेच आजच्या दिवशी घेण्याचे जाहीर केले होते. शिवाय, राज्य सरकारला नोटीस बजावून याप्रकरणी उत्तर मागितले होते. अखेर आज झालेल्या सुनावणीवेळी कोर्टाने या प्रकरणी दोन आठवड्यांनंतरची तारीख दिली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडेंसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.

बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई तालुक्‍यातील पूस या गावात जगमित्र सहकारी साखर कारखाना प्रस्तावित होता. कारखान्याच्या जमीन खरेदी करतेवेळी घोटाळा झाल्याचा आरोप आहे. रत्नाकर गुट्टे यांचे जावई राजाभाऊ फड यांनी ही याचिका दाखल केली आहे. फड यांनी बर्दापूर पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांनी तक्रारीची दखल न घेतल्याचे सांगत त्यांनी न्यायालयाचे दार ठोठावले होते.

दरम्यान, परळी मतदारसंघात मुंडे विरुद्ध मुंडे अशी बहिण-भावांमध्ये लढत होत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तिकीटावर धनंजय मुंडे पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. भाजपच्या विद्यमान आमदार पंकजा मुंडे यांच्याविरोधात ते उभे ठाकले असून संपूर्ण राज्याचे या मतदारसंघकडे लक्ष लागून राहिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.