पुणे – शहरातील पाणी पुरवठ्यासाठी गेल्या 50 वर्षांत टाकण्यात आलेल्या मुख्य जलवाहिन्यांमधील (ट्रान्समिशन लाइन) गळती रोखण्यासाठी महापालिका सरसावली आहे. शहरात अशा सुमारे 250 किलोमीटरच्या मुख्य जलवाहिन्या असून त्यातील 60 कि.मी. अंतरावरील जलवाहिनीत गळती असल्याची प्राथमिक बाब समोर आली आहे. यामुळे दररोज हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे.
जलवाहिन्यांना असलेली ही गळती नेमकी कुठे आहे, याची तपासणी महापालिकेकडून करण्यात येणार आहे. अशा प्रकारे पहिल्यांदाच पाणीगळती शोधण्यात येत असून, ही सापडल्यास लाखो लिटर पाणी शहरासाठी मिळणार आहे. शहरात दिल्या जाणाऱ्या एकूण पाण्यापैकी तब्बल 35 टक्के पाणी गळतीमध्ये वाया जाते आहे. ही गळती 100 टक्के थांबविणे शक्य नसले, तरी हे गळतीचे प्रमाण 10 ते 15 टक्क्यांवर आणण्यासाठी हे काम हाती घेण्यात आले आहे.
शहरात समान पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. या अंतर्गत शहराचे 141 झोन तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक झोनसाठी एक स्वतंत्र जलवाहिनी पाणीपुरवठा करणार असून हे पाणी मीटरद्वारे मोजले जाणार आहे. त्यामुळे गळती रोखण्यासाठी महापालिकेने जलकेंद्रातून मुख्य जलवाहिनीत सोडण्यात येणारे पाण्यासाठी फ्लो मीटर बसवला असून, दुसरा फ्लो मीटर या मुख्य जलवाहिनीवर ज्या ठिकाणी झोनसाठी स्वतंत्र जलवाहिनी आहे. त्या ठिकाणी बसविलेला आहे.
परिणामी, मुख्य जलवाहिनीत किती पाणी सोडले आणि प्रत्यक्ष झोनपर्यंत किती पोहचले, हे लगेच लक्षात येत आहे. त्यामुळे आतापर्यंत जुन्या जवळपास 60 किलोमीटरच्या जलवाहिनीत जलकेंद्रातून सोडलेले पाणी आणि प्रत्यक्षात पुढे गेलेले पाणी यात लक्षणीत तफावत आढळली आहे. त्यामुळे या जलवाहिनीची तपासणी केली जाणार आहे.
गॅस आणि आवाजाद्वारे तपासणी
ही गळती शोधण्यासाठी हेलियम गॅस आणि आवाजाच्या ‘सेन्सर’चा वापर केला जाणार आहे. अशाच प्रणालीद्वारे महापालिकेने वडगाव जलशुद्धीकरण केंद्र ते तळजाई टेकडीच्या मुख्य जलवाहिनीची तपासणी केली होती. यात 13 ठिकाणी गळती सापडली आहे. तर या गळती शोधण्याचा खर्च प्रति किलोमीटर 1 लाख रुपये असल्याने पहिल्या टप्प्यात 60 लाखांची निविदा काढली जाणार आहे.