पुणे : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या तयारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी हवेली तसेच पुरंदर तालुक्यातून जाणाऱ्या पुणे-सासवड-जेजुरी-नीरा या पालखीमार्गाला व पालखी तळ, विसाव्यांच्या ठिकाणांना भेटी दिल्या. तसेच तेथील तयारीच्या अनुषंगाने आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी यांनी वारकऱ्यांना कोणत्याही असुविधांना तोंड द्यावे लागू नये याची दक्षता घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पुरंदरचे उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड, प्रांताधिकारी संदेश शिर्के, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे संचालक संजय कदम, हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते, पुरंदरच्या तहसीलदार रुपाली सरनोबत, हवेलीचे गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, पुरंदरचे गटविकास अधिकारी अमर माने, पुणे सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे मनपा क्षेत्रीय अधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी, संबंधित गावचे पदाधिकारी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
पालखीमार्गावर आरोग्य सुविधा, पुरेसा औषध साठा, फिरत्या शौचालयांची व्यवस्था, पाणी, वीज आदी सर्व सुविधा प्राधान्याने पुरवण्यात याव्यात. कोविड तपासण्यांची व्यवस्था करण्यात आली असून खबरदारी म्हणून जास्तीत जास्त नमुने घेण्यात यावेत, असे आदेश डॉ. देशमुख यांनी यावेळी दिले.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचना
– ऊरुळी देवाची पोलीस ठाण्याजवळील विसाव्याच्या ठिकाणाची डागडुजी करण्याच्या सूचना दिल्या. वडकी विसावा येथे स्थायी स्वरुपात सिमेंट कॉंक्रेटचे स्टेज बांधण्याचे काम अंतिम टप्प्यात असून ते पालखीपूर्वी पूर्ण करावे.
-पालखीमार्गाच्या साईडपट्टया भरुन घेण्यासह खड्डे तसेच पाणी साचणाऱ्या ठिकाणी मुरूम व अन्य पर्यायांचा वापर करुन डागडुजी करावी. हे काम कोणत्याही परिस्थितीत दि.20पूर्वी पूर्ण करावे.
-दिवे घाट पार केल्यानंतर झेंडेवाडी येथे वारकऱ्यांना मोठा विसावा घ्यावा लागतो. तेथील शेतकऱ्यांनी संरक्षक जाळ्या (कंपाऊंड) केलेले आहे. त्या ठिकाणी वारकऱ्यांना विसावा घेता यावा, यासाठी व्यवस्था करावी.
-दिवे घाटामध्ये रात्री वैद्यकीय कचरा (मेडिकल वेस्ट) टाकण्यात येत असल्याच्या तक्रारींच्या अनुषंगाने घाटामध्ये दिवसा तसेच रात्री गस्त घालण्यात यावी. असे प्रकार आढळून आल्यास कठोर कारवाई करण्यात येईल.
-सासवड पालखीतळ येथे पावसाचे पाणी साचते. त्यामुळे या पालखीतळाची उंची वाढवण्याचे काम सुरू असून ते गतीने पूर्ण करण्याच्या सूचना सासवड नगरपरिषदेला देण्यात आल्या.