पुणे –करोना संसर्गाच्या काळात पुण्यातून बंद करण्यात आलेली आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे जवळपास दीड वर्षानंतर पुन्हा सुरू होणार आहेत. पुणे विमानतळावरून पुणे-दुबई ही आंतराष्ट्रीय विमानसेवा पुन्हा सुरू होणार आहे.
देशात 2020च्या सुरुवातीस करोनाबाधित रुग्ण सापडल्यानंतर नागरी उड्डाण महासंचलनालयाने (डीजीसीए) तातडीने कारवाई करत, आंतरराष्ट्रीय विमानसेवा स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, पुणे विमानतळावरूनही आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे रद्द करण्यात आली होती. तब्बल दीड वर्षे झाल्यानंतरही ही विमानसेवा सुरू झाली नव्हती.
मात्र, करोना संसर्गाबाबतची सद्यस्थिती पाहता, महासंचलनालयाने पुणे विमानतळावरून पुणे-दुबई या आंतरराष्ट्रीय विमानसेवेला परवानगी दिली आहे. त्यानुसार स्पाईसजेट या विमान कंपनीतर्फे लवकरच पुणे-दुबई सेवा पुन्हा सुरू करणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. दुबईला जाणारे विमान पुण्याहून दररोज सकाळी 07:50 वाजता निघेल. विमान कंपनीकडून तिकीट बुकिंगची तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असे सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर इतर विमान कंपन्यांही त्यांची आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याचा प्रयत्न करीत आहेत. याबाबतचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी डीजीसीएकडे पाठवण्यात आला आहे. महासंचलनालयाकडून याबाबतची मंज़ुरी मिळाल्यावर इतर विमान कंपन्यांच्याही सेवा सुरू होतील.