पुणे – लोहगाव विमानतळ रस्त्यावर मलनित्सारण वाहिनी जोडण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे विमानतळ वाहतूक विभागांतर्गत 27 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजल्यापासून ते 29 नोव्हेंबर रोजी 6 वाजेपर्यंत नवीन विमानतळ रस्त्यावरील लुंकड गोल्डकॉस्ट (सिम्बायोसिस इंटरनॅशनल स्कूल) ते टाऊन स्क्वेअर दरम्यानची वाहतूक बंद करण्यात येणार असल्याने या भागातील वाहतुकीत बदल केला आहे.
लोहगाव भागातील वाहतूक सुरळीत होण्याच्या अनुषंगाने विमानतळ वाहतूक विभागांतर्गत बदल करण्यात आला आहे. या बदलाबाबत वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी आदेश दिले. 27 ते 29 नोव्हेंबरदरम्यान नागरिकांनी पर्यायी रस्त्याचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.
असा आहे वाहतूक बदल
रामवाडी/नगर रस्त्याने विमानतळाकडे जाणाऱ्या वाहनांनी न्यू एअरपोर्ट रोडवरून लुंकड गोल्डकॉस्ट येथून उजवीकडे वळून (सिम्बायोसिस इंटरनॅशनल स्कूल समोरून) विमाननगर रस्त्याने पुढे उडाण गार्डन चौक येथून डावीकडे वळून कोनार्क नगररस्त्याने पुढे शिवराव लक्ष्मण बलघरे चौकातून डावीकडे वळून पुढे टाऊन स्क्वेअर येथून उजवीकडे वळून न्यू एअरपोर्ट रोडने इच्छितस्थळी जावे.
विमानतळाकडून रामवाडी/नगर रस्त्याने जाणाऱ्या वाहनांना टाऊन स्क्वेअर येथून डावीकडे वळून बलघरे चौकातून उजवीकडे वळून उडाण गार्डन चौक येथून उजवीकडे वळून विमाननगर रस्त्याने लुंकड गोल्डकॉस्ट येथून डावीकडे वळून न्यू एअरपोर्ट रोडने इच्छितस्थळी जावे.