पुणे – शहरात करोनामुळे मृत्यू होणाऱ्याची संख्या दररोज झपाट्याने वाढत असून, आज (दि.4) आणखीन 6 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पोलीस अधिकाऱ्याचाही समावेश आहे. यात भवानी पेठेतील 52 वर्षीय महिलेचा पहाटे सिम्बॉयसिस रुग्णालयात उपचादरम्यान मृत्यू झाला. त्यांना 23 एप्रिल रोजी रूग्णालयात दाखल केले होते.
लोहियानगर येथील 65 वर्षीय महिलेला 1 मे रोजी ससून रुग्णालयात दाखल केले. मात्र, आज मध्यरात्री त्यांचा मृत्यू झाला. तर औंध येथील जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या 50 वर्षीय व्यक्तीचा सकाळी मृत्यू झाला. ते पाटील इस्टेट, शिवाजीनगर याठिकाणी राहत होते.
हडपसर येथील सह्याद्री रुग्णालयात 1 मे रोजी रामटेकडी परिसरातील 58 वर्षीय व्यक्तीला अत्यावस्थेत रुग्णालयात घेऊन आले. मात्र, रुग्णालयात पोहचण्याआधीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविले असता, अहवाल करोना पॉझिटिव्ह आले.