मुंबई – बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ यांची पत्नी आयेशा श्रॉफ यांची ५८ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी सांताक्रूझ पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली आहे.
जॅकी श्रॉफची पत्नी आयेशा श्रॉफसोबत 58 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे. आयशाच्या तक्रारीनुसार, अॅलन फर्नांडिस नावाच्या व्यक्तीने तिची ५८ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. या घटनेबाबत पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम ४२०, ४०८, ४६५, ४६७ आणि ४६८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी विलंब न लावता या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2018 मध्ये अॅलनला एमएमए मॅट्रिक्स कंपनीमध्ये डायरेक्टर ऑफ ऑपरेशन्सची जबाबदारी सोपवण्यात आली होती. एमएमए मॅट्रिक्स जिमला टायगर श्रॉफ आणि त्याची आई आयशा चालवते.
आरोपींनी भारतात आणि भारताबाहेर 11 टूर्नामेंटची योजना बनवली होती, असेही बोलले जात आहे. या कार्यक्रमासाठी त्यांनी कंपनीकडून मोठी रक्कमही घेतली होती. डिसेंबर 2018 ते जानेवारी 2023 पर्यंत या स्पर्धेसाठी कंपनीच्या खात्यात 58,53,591 रुपये जमा करण्यात आले.