मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना ट्विटरद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे आहे. याप्रकारानंतर राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ मुंबई पोलीस आयुक्तांच्या भेट घेतली. ‘तुझा दाभोळकर केला जाईल’ अशा स्वरूपाची धमकी ट्विटरच्या माध्यामातून शरद पवारांना देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, या धमकीनंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले असल्याचे पाहायला मिळत आहे.
शरद पवारांनी ज्या ट्विटर आकाउंटवरून धमकी देण्यात आली, त्याच्या बायोमध्ये मी भाजप कार्यकर्ता आहे असा उल्लेख आहे. या ट्विटर युजरचे नाव सौरभ पिंपळकर असे असून त्याने त्याच्या बायोमध्ये “मी भाजपचा कार्यकर्ता आहे. मला धर्मनिरपेक्षतेचा तिरस्कार आहे” असं लिहिलेलं आहे.
अशात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अमोल मिटकरी यांनी ट्विटमध्ये फोटो शेअर करत लिहिले आहे,’हे आमच्या रक्तात नाही म्हणणारे बावनकुळेजी हे रक्त नेमकं कुणाचं आहे? पवार साहेबांना धमकी देणारा पिंपळकर तुमच्या बाजूला केक कापतोय , ‘राजकारण महाराष्ट्राचे’ ‘नर्मदाबाई पटवर्धन’ सौरभ पिंपळकर हे ट्विटर अकाउंट कुणाच्या रक्ताचे?#कराराजवाबमिलेगा’ असं म्हणत प्रश्न उपस्थित केला आहे. शरद पवार यांना धमकी देणारा चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत केक कापतोय? अमोल मिटकरी यांच्याकडून फोटो ट्विट करत भाजप नेत्यांना सवाल विचारला आहे.
याचबरोबर अमोल मिटकरी यांनी आणखी एक फोटो शेअर केलाआहे. या ट्विटमध्ये त्यांनी भाजपचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना फोटो शेअर केलाय. एक व्यक्ती दानवे यांच्याबद्दलचे मत मांडत असल्याचं या ट्विटमध्ये म्हटलं आहे. दानवे यांनी आपल्याला सोशल मीडिया संबंधित आयोजित कार्यक्रमाला निमंत्रित केलं होतं, असं त्या फोटोमध्ये लिहिलेलं बघायला मिळत आहे. या फोटोलाही मिटकरी यांनी हे रक्त कुणाचं? असं कॅप्शन दिलं आहे.
दरम्यान, शरद पवार यांना धमकी दिल्या प्रकरणी सुप्रिया सुळेंनी पोलीस आयुक्तांची भेट घेत आहे. तसेच या प्रकरणी लवकरात लवकर धमकी देणाऱ्याला अटक करण्यात यावी अशी मागणी गृहखात्याकडे केली आहे. तसेच काही बरंवाईट झालं तर याला पूर्णपणे देशाचे आणि राज्याचे गृहखाते जबाबदार असेल असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.