सातारा – एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असतानाही सातारा आगाराची बससेवा हळूहळू पूर्वपदावर येत आहे. आगारातील 532 कर्मचारी सोमवारी कामावर हजर झाले असून, 12 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याचे समजते.
एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्याप सुरू असून, ते मागण्यांवर ठाम आहेत; परंतु आर्थिक नुकसान टाळण्यासाठी व प्रवाशांची गैरसोय होऊ नये, याकरिता राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एसटी बससेवा सुरू करण्याचा प्रयत्न केला आहे. स्वारगेट, मुंबई, कराड आदी मार्गांवर सोमवारी बसेस सोडण्यात आल्या. काही ग्रामीण भागातही लालपरीची सेवा सुरू करण्यात आली होती.
आगारातील 534 कर्मचारी सोमवारी सेवेत पुन्हा रूजू झाले. यापूर्वी काही कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीच्या नोटिसा बजावण्यात आल्या होत्या; परंतु सोमवारी केवळ निलंबनाची कारवाई करण्यात आली. एकंदरीत प्रवाशांच्या सेवेत दाखल होणाऱ्या एसटी बसेसची संख्या हळूहळू वाढत आहे. खासगी शिवशाही बसेसबरोबर लालपरीही सुरू झाली आहे. सातारा-स्वारगेट या मार्गावर सोमवारी 22 बसगाड्या (जाऊन-येऊन एकूण 44 फेऱ्या) सोडण्यात आल्या.
सातारा-मुंबई मार्गावर चार गाड्या, सातारा-कराड, कराड-स्वारगेट मार्गावर प्रत्येकी एक, पाटणमधून चार गाड्या ग्रामीण भागात सोडण्यात आल्या. कोयनानगर, कुसरुंडी या गावांमध्ये गाड्या सोडण्यात आल्या. महाबळेश्वर-तापोळा मार्गावर एक एसटी बस सोडण्यात आली. ग्रामीण भागात फेऱ्या सुरू होत असल्याने प्रवाशांमधून आनंद व्यक्त होत आहे.
कर्मचाऱ्यांना कामावर येण्याचे आवाहन
तब्बल 22 दिवसांनी साताऱ्यातून लालपरी मंगळवारी पोलीस बंदोबस्तात स्वारगेटकडे रवाना झाली. शिवशाही बसेसची सेवाही काही प्रमाणात सुरू आहे. ग्रामीण भागात सातारा-सातारारोड ही पहिली बस सुरू करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांनी कामावर पुन्हा हजर व्हावे, असे आवाहन आगार व्यवस्थापक रेश्मा गाडेकर यांनी केले आहे.