जयपुर – इटालीतून राजस्थानात आलेल्या पर्यटकांपैकी पंधरा जणांना करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. राजस्थानातील एकूण 215 जण त्यांच्या संपर्कात आले असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले त्यापैकी 51 जणांचे नमुने निगेटिव्ह आल्याचे राजस्थानचे आरोग्यमंत्री रघु शर्मा यांनी आज विधानसभेत सांगीतले.
ते म्हणाले, या 215 जणांपैकी 93 जणांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत. त्यातील 51 संशयीतांना करोनाची लागण झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अन्य 42 जणांचे रिपोर्ट अजून आलेले नाहीत. इटालीतील हे करोनाग्रस्त पर्यटक राजस्तानातील झुनझुनु, जोधपुर, जैसलमेर, बिकानेर, उदयपुर आणि जयपूर या ठिकाणी गेले होते त्यावेळी त्यांच्या संपर्कात जे जे लोक आले आहेत त्यांना शोधून काढण्यात आले आहे. ही संख्या 215 इतकी आहे.
राज्यात करोनावरील औषध उपलब्ध नाही त्यामुळे त्यांना वेगळे ठेऊन त्यांना स्वाईन फ्ल्युची औषधे दिली जात आहेत, असेही आरोग्यमंत्र्यांनी नमूद केले. इटालीचे हे पर्यटक दिल्ली मार्गे राजस्थानात आले आहेत. तेथे त्यांची आरोग्य तपासणी झाली होती की नाही हे आम्हाला समजले नाही किंवा त्यांच्या तपासणीची माहिती आम्हाला देण्यात आलेली नाही असेही राजस्थान सरकारकडून सांगण्यात आले आहे.
राजस्थान सरकारने त्या राज्यात येणाऱ्या सर्व विदेशी पर्यटकांची विमानतळावर तपासणी करण्यासाठी विशेष पथके तैनात केली आहेत अशी माहितीही आरोग्यमंत्र्यांनी दिली. या प्रसंगाचा सामना करण्यासाठी सर्व विरोधी पक्ष सरकारच्या बाजूने उभे आहे अशी ग्वाही विधानसभेतील विरोधी पक्ष नेते गुलाबचंद कटारिया यांनी विधानसभेत दिली.