सिल्हेट (बांगलादेश) – तमीम इकबालच्या दीडशतकी खेळीनंतर तैजुल ईस्लामच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर बांगलादेशने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात झिम्बाब्वेचा 4 धावांनी पराभव करत विजय नोंदविला. या विजयासह बांगलादेशने तीन सामन्यांच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. तमीम इकबाल सामन्याचा मानकरी ठरला.
बांगलादेशने विजयासाठी दिलेल्या 323 धावांचा पाठलाग करताना झिम्बाब्वेच्या संघास 50 षटकांत 8 बाद 318 अशी मजल मारता आली. झिम्बाब्वेकडून फलंदाजीत सिंकदर रजाने 66(57), वेस्ले मधवीरेने 52(57), तिनाशे कामुनहुकाॅम्वेने 51(70) आणि डाॅनल्ड टिरिपानोने नाबाद 55(28) धावांची खेळी केली पण संघास विजय मिळवून देण्यास ते अपयशी ठरले. बांगलादेशकडून तैजुल ईस्लामने सर्वाधिक 3, अल-अमीन होसैन, मेहदी हसन, शफीउल इस्लाम आणि मशरफे मोर्तजा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
Bangladesh won by 4 runs#BANvZIM #RiseOfTheTigers pic.twitter.com/Mni47LfXl7
— Bangladesh Cricket (@BCBtigers) March 3, 2020
तत्पूर्वी, बागंलादेशने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 8 बाद 322 धावा केल्या होत्या. बांगलादेशकडून फलंदाजीत तमीम इकबालने 136 चेंडूत 20 चौकार व 3 षटकारासह सर्वाधिक 158 धावांची खेळी केली. तर, मुशफिकुर रहीमने 55(50), महमूदुल्लाहने 41(57) आणि मोहम्मद मिथुनने नाबाद 32(18) धावांची खेळी केली. झिम्बाब्वेकडून गोलंदाजीत कार्ल मुम्बा आणि डाॅनल्ड टिरिपानो यांनी प्रत्येकी 2 तर वेस्ले मधवीरे आणि चार्लटन तशुमा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.