पुणे : असं म्हणतात की राजकारणात कोणी कोणाचा वैरी नसतो आणि कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो. याचीच प्रचिती देणारा एक फोटो पुण्यात सध्या व्हायरल होतोय.
या फोटोत पुण्यात शहर काँग्रेसने घेतलेल्या छत्री दुरुस्ती शिबिरात चक्क भाजपने वाटलेली छत्री दुरुस्तीसाठी आली आहे. त्यामुळे केंद्रात या दोन्ही पक्षात रोज आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत असल्याने रोजच राजकारण तापत असले तरी, पुणेकरांना थंडीचा अनुभव देणाऱ्या या पावसाळ्यात भाजपच्या मदतीला काँग्रेस धावून आल्याची खुमासदार चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
यावर आता भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी देखील ट्विट करत काँग्रेसला टोला लगावला आहे. ‘सध्या दोन चिल्लर पक्षांच्या छता खाली असलेला काँग्रेस पक्ष फुटकळ कामांची किती मोठी जाहिरातबाजी करतोय पाहा, या होर्डिंग च्या किमतीत 50 नव्या छत्र्या आल्या असत्या’ असा टोला देखील अतुल भातखळकर यांनी काँग्रेसच्या या उपक्रमावर लगावला आहे.