पुणे – शहरात गेल्या 24 तासांत करोनामुळे ससून रुग्णालयातील 3 आणि अन्य ठिकाणच्या दोघांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. दरम्यान, आतापर्यंत मृत झालेल्या व्यक्तीमध्ये पुरुषांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे.
रविवारी (दि.26) दिवसभरात दोन तर शनिवारी रात्री एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यामध्ये हडपसर येथील 66 वर्षीय व्यक्तीला श्वसनाचा त्रास सुरू झाल्यामुळे दि. 24 एप्रिल रोजी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, दि. 25 रोजी रात्री उशिरा त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान त्यांचे नमुने अहवाल प्राप्त झाल्यावर त्यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. पाटील इस्टेट येथे राहणाऱ्या 65 वर्षीय व्यक्तीला 20 एप्रिल रोजी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांना अन्य आजार असल्यामुळे आज दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला.
तसेच, कोंढवा परिसरात राहणाऱ्या व्यक्तीला 18 एप्रिलपासून करोनाची लक्षणे दिसून येत होती. मात्र, ते उशिरा 22 तारखेला ससून रुग्णालयात दाखल झाले. त्यांची नमुने तपासणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला. मात्र, आज दुपारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. वरील तीनही रुग्णांची विविध आजार असल्याची हिस्ट्री होती. तर, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात 77 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. दि. 24 एप्रिल रोजी 51 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. मात्र, त्यांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असता त्याचा अहवाल काल रात्री पॉझिटिव्ह आला, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.