पिंपरीतआणखी 497 बाधित; आठ जणांचा मृत्यू

करोनाचा कहर : एकूण रुग्णसंख्येच्या 53 टक्के रुग्ण अवघ्या दहा दिवसांत

पिंपरी (प्रतिनिधी) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज करोनाबाधितांची रुग्णसंख्या पुन्हा चारशेचा टप्पा ओलांडून पाचशेच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचली आहे. एकाचदिवशी शहरात 497 जणांना करोनाची लागण झाली. तर आठ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शहरात मार्च महिन्यापासून जेवढे रुग्ण आढळले, त्यापैकी 53 टक्के रुग्ण हे अवघ्या दहा दिवसांच्या कालावधीत सापडले आहेत.

शहरातील सर्वच भागात करोनाचा शिरकाव झाला आहे. करोनाचा उद्रेक मोठ्या प्रमाणात वाढला आहे. जूनमध्ये शंभर ते दोनशेच्या दरम्यान रोज आढळणारे बाधित आता पाचशेच्या घरात जाऊ लागले आहे. शुक्रवारी शहरात 497 रुग्ण आढळले. त्यापैकी शहरातील 488 जणांचा समावेश आहे. तर शहराबाहेरील 9 जणांनाही करोनाची लागण झाली आहे. शहरातील एकूण रुग्णसंख्या 6549 इतकी झाली आहे.

शहरात मार्च महिन्यामध्ये पहिला करोनाचा रुग्ण आढळला. त्यानंतर मे महिन्यापासून रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली. तर जुलै महिन्यामध्ये दररोज नवीन उच्चांक गाठत रुग्णसंख्या वाढत आहे. 30 जून रोजी शहरातील रुग्णसंख्या 3029 इतकी होती. त्यादिवशी 120 जणांना करोनाची लागण झाली होती. त्यानंतर 1 जुलैपासून शहरातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली. 1 ते 10 जुलै या दहा दिवसांच्या कालावधीत 3520 रुग्णांची वाढ झाली. म्हणजेच एकूण रुग्णसंख्येच्या 53 टक्के रुग्णसंख्या या दहा दिवसांत वाढली आहे.

शहरात शुक्रवारी आठ रुग्णांचा मृत्यू झाला. नेहरुनगर, चिंचवडेनगर, इंद्रायणीनगर येथील चशार महिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर पिंपरीगाव, पिंपळे गुरव, आनंदनगर चिंचवड व मोरे वस्ती चिखली येथील चार पुरुषांचा मृत्यू झाला. आजपर्यंत शहरात करोनाने 131 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये शहरातील 95 रुग्णांचा व शहराबाहेरील 36 जणांचा समावेश आहे.

सद्यस्थितीत शहरात 2789 रुग्ण उपचाराधीन आहेत. तर आजपर्यंत 3849 रुग्णांना घऱी सोडण्यात आले आहे. करोनाचा विळखा तरुणाईला जास्त बसला असून शहरात 2560 रुग्णांना करोनाची लागण झाली आहे. त्याखालोखाल प्रौढ व्यक्ती म्हणजेच 40 ते 59 वर्ष वयोगटातील 1799 जणांना करोनाची लागण झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.