राजगुरूनगर : खेड तालुक्यात आज एकाच दिवशी ३८ व्यक्ती पॉझिटिव्ह सापडल्या असून एका व्यक्तीचा करोनामुळे मृत्यू झाल्याने तालुक्यातील मृतांची संख्या ८ वर पोहचली आहे. अशी माहिती खेड पंचायत समितीचे सभापती अंकुश राक्षे यांनी दिली.
खेड तालुक्यात दिवसभरात ३८ करोना पॉझिटिव्ह सापडल्या आहेत. खेड तालुका आता करोनायुक्त तालुका बनला आहे. करोना बाधित व्यक्तीच्या संख्येत दररोज लक्षणीय वाढ होत आहे. आज दिवसभरात शेलू, येलवडी, गोसासी, खराबवाडी, वाकी बुद्रुक, मेदनकरवाडी, वडगाव घेनंद, चऱ्होली, काळूस येथे प्रत्येकी एक व्यक्ती, आळंदी ९ व्यक्ती, चाकण ६ व्यक्ती, नाणेकरवाडी, निघोजे प्रत्येकी २ व्यक्ती, राजगुरूनगर ४ व्यक्ती, वाकी खुर्द आणि चिंबळी येथे प्रत्येकी ३ व्यक्ती अशा ३८ व्यक्ती आज करोनाबाधित सापडल्या आहेत. तालुक्यातील आकडेवारी झपाट्याने वाढू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीजन्य वातावरण निर्माण झाले आहे.
करोना विषाणूचा सामना करण्यासाठी प्रभावी यंत्रणा तालुक्यात राबविण्याची मागणी नागरिक करीत आहेत. त्या दृष्टीने प्रशासनही पावले उचलत आहे. संपूर्ण तालुका कंटेनमेंट झोन करण्याची मागणी जोर धरत असून प्रशासन ज्या गावांमध्ये नगरपरिषदांमध्ये करोना व्यक्ती आढळल्या त्या गावांमध्ये कंटेनमेंट झोन आणि कडक लॉकडाऊन करण्याच्या प्रयत्नात असून येत्या दोन दिवसात हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
म्हाळुंगे कोव्हीड केअर सेंटर मधून केवळ ५० स्वब तपासणी साठी पाठविण्यात येत होत्या. बाधितांची संख्या मोठी असल्याने अडचणीचे होते. यावर मार्ग काढत खेड पंचायत समितीचे सभापती अंकुश राक्षे यांनी जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन डॉ.अशोक नांदापूरकर, डॉ डी डी देशमुख यांच्याशी संपर्क करून दररोज एनआयव्ही लॅब मध्ये ५० स्वब व बीजे मेडिकलच्या लॅबला ५० स्वब असे दररोज १०० स्वब म्हाळुंगे कोव्हीड केअर सेंटरमधून पाठविण्यास मंजुरी मिळाली आहे. यामुळे स्वब टेस्ट ची अडचण दूर होणार आहे अशी माहिती पस सभापती अंकुश राक्षे यांनी दिली
खेड तालुक्याची करोना विषाणू संसर्ग आकडेवारी पुढील प्रमाणे :
एकूण बाधित व्यक्ती = ३३०
करोनामुक्त व्यक्ती = ११९
उपचार घेत असलेल्या व्यक्ती = २०३
तालुक्यातील एकूण मृत्यू = ८
आजच्या बाधित व्यक्ती = ३९